धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 17 मे : कोरोना व्हायरस आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला. मोठ्या उद्योगांनाही ब्रेक बसला. त्या निराशाजनक कालखंडातही एका कलाकारानं मुंबईत संघर्ष करण्याचं धाडस दाखवलं. त्यानं या कलेच्या जोरावर सामान्यांपासून सेलिब्रेटी तसंच राजकारण्यांचीही मनं जिंकली आहेत. स्वत:च्या संघर्षाबरोबरच एका कलेला जिवंत ठेवण्याचा हा कलाकार प्रयत्न करतोय.
काय आहे संघर्ष?
तुमच्या शहरातून (मुंबई)
सुरेश सुर्यवंशी असं या लढवय्या कलाकाराचं नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे आहेत. त्यांचं B.Sc. पर्यंत शिक्षण झालंय. या कालावधीत त्यांची अक्षराशी मैत्री झाली. विविध शैलीतील अक्षरांच्या आधारे नाव तयार करून देण्याचा त्यांना छंद होता. ते संभाजीनगरमध्ये राहून 10-12 वर्ष कॅलिग्राफी करत होते. स्थानिक प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ही कला पोहचवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण, त्याला पुरेसं यश मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी मुंबईची वाट धरली.
मुंबईत आल्यानंतर बराच संघर्ष करावा लागला. मुंबईत राहण्याची जागा परवडणारी नव्हती म्हणून त्यांनी डोंबिवलीत घर घेतलं. काम मिळावं यासाठी नरिमन पॉईंट, वांद्रे स्टेशन, कल्याण स्टेशन बाहेर उभं राहून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आपली कला सादर करून दोन पैसे गाठीशी राहावे म्हणून कॅलिग्राफी आर्ट तयार करून द्यायचे.
कोणत्याही कलाकाराच्या नशिबात संघर्ष हा कायम लिहीलेला असतो. सुरेशही त्याला अपवाद ठरले नाही. मुंबईत हळुहळु जम बसतोय असं वाटत असतानाच कोरोनाच्या फेऱ्यानं सर्वच चित्र बदललं. लॉकडाऊनमध्ये सुरेश यांनी गावची वाट धरली. करोनामुळे आजूबाजूला निर्माण झालेली परिस्थिती पहाता सुरेशच्या आई-बाबांनी त्यांना मुंबईला जाण्याची गरज नाही असं सांगितलं. मात्र मुंबईत आपलं नाव मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सुरेश यांना घरच्यांचं म्हणणं पटलं नाही. त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याचा निर्धार करत पुन्हा मुंबई गाठली.
मुंबईकरांनो, स्वस्त मस्त कपडे शिवून घ्यायचे? ही आहे बेस्ट जागा, VIDEO
मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली. ‘इमारतीमधील दारावरच्या नेमप्लेट त्यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून देण्यास सुरूवात केली. अभिनेते सचिन पिळगावकर, संगीतकार अजय-अतुल, मनसे आमदार राजू पाटील तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारखे सेलिब्रेटी तसंच राजकारण्यांनीही त्यांच्या कार्यालयातील नेमप्लेट सुरेश यांच्याकडून तयार करून घेतली आहे.
सेलिब्रेटी आणि राजकारण्यांना प्रभावित करणाऱ्या सुरेश यांचा आजही परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे. ते गेल्या चार वर्षांपासून मुंबईत राहात असून मुंबईतील मोठी रेल्वे स्टेशन तसंच प्रसिद्ध पर्यटन स्थळी ते नागरिकांसमोर त्यांची कला सादर करुन उदारनिर्वाह करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.