मुंबई, 20 एप्रिल : विरोधी पक्षनेते अजित पवार मागील काही दिवसांपासून चर्चेत होते. पवार भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला असून अजित पवार आपल्या भूमिकेत परतले आहेत. त्यांनी एकाच वेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दोन पत्र पाठवली आहेत. यातील एक पत्र खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात 14 श्रीसदस्यांचा मृत्यूप्रकरणी आहे. तर दुसरं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील चित्रिकरणासंदर्भातील आहे.
उष्माघाताच्या घटनेवरुन अजित पवार आक्रमक
तुमच्या शहरातून (मुंबई)
घटनेनंतर मी प्रत्यक्ष जखमी, मृतांचे नातेवाईक आणि डॉक्टरांची भेट घेतली होती. तसेच इतर मागण्यांसह या घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. सुरुवातील उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आता सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माडियाच्या माध्यमातून तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांकडून वेगळीच माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. उपस्थित अनुयायांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती. श्रीसदस्य 7 तास अन्नपाण्याशिवाय होते. त्यामुळे अनेकांना त्रास झाला. गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रग्णापर्यंत पोहचू शकली नाही. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उन्हात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम करण्याचा अनुभव नव्हता. या सर्व गोष्टींची शहानिशा करुन सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे शासनाने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तब्बल 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वर चढलेला आहे. अशात असा कार्यक्रम घेण्यासाठी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती. ती न झाल्यामुळे 14 अनुयायांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. तसेच या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील शुटींग वरुन पवार आक्रमक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तूला फार मोठा इतिहास आहे. असं असताना या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे.
हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळिमा फासणारा आहे. यामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीनं प्राप्त करून घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासन स्तरावरूनही आदेश देण्यात यावेत. भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात अथवा शिक्षण संकुलात होणार नाही, या दृष्टिकोनातून शासनामार्फत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असंही पत्रात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.