जळगाव, 25 एप्रिल : अजित पवार नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी होतील, अशा चर्चा मागच्या काही काळापासून सुरू होत्या, पण अजित पवारांनी समोर येऊन या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट करत आपण राष्ट्रवादी सोडून जाणार नाही, हे सांगितलं. यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदावरच दावा केला. 2024 कशाला आताही मुख्यमंत्रिपदावर दावा, असल्याचं सूचक विधान अजित पवारांनी केलं.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसंच मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे. काही का होईना, जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत आम्ही महाविकासआघाडीमध्ये प्रयत्न करणार. अजित पवारांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला, तरच महाराष्ट्राचं हित आहे, असं अनिल पाटील म्हणाले.
‘मला आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, असं वाटतं. यासाठी महाविकासआघाडीने परवानगी द्यावी. महाविकासआघाडीमध्ये आमचं मत जरी विचारात घेतलं जात नसेल, तरीही आमची भावना अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी आहे,’ अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली.
ठाकरेंचा राष्ट्रवादीला प्रस्ताव?
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणालाही मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव ठाकरेंनी शरद पवारांना दिला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.