मुंबई, 21 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाची बाजू मांडण्यावरून वाद झाला होता. मात्र, आता संजय राऊत यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो, ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत, गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचे गोडवे गायले. ‘कोण संजय राऊत?’ असं म्हणत हल्लाबोल चढवणाऱ्या अजित पवारांसमोर संजय राऊतांनी नरमाईची भाषा वापरली.
काय म्हणाले संजय राऊत?
तुमच्या शहरातून (मुंबई)
“अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही परवा एकत्र बसून जेवलो, अजित पवार म्हणजे स्वीट डिश. ते रागावले तरी रागवू द्या. माणसाचे मन हलके होते. पवार कुटुंबात कुणाशी माझा वाद नाही. अजितदादा महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत.” असंही संजय राऊत म्हणाले. मी इतर पक्षासंदर्भात कधीही मत व्यक्त करत नाही. माझा संबंध महाविकास आघाडी म्हणून सगळ्या घटकपक्षांमध्ये समन्वय राखण्याचा आहे, त्यामुळे कोणीही असेल तर मी बोलेन, असं संजय राऊत म्हणाले.
भारतीय जनता पार्टी लावा लावी करत असेल तर त्यांना सांगू इच्छितो तुमचा डाव यशस्वी होणार नाही. आमचा मुख्य मुद्दा आहे की खारघरच्या त्या कार्यक्रमात काय घडलं ज्यांचा मृत्यू झाला त्यांची स्वतंत्रपणे चौकशी व्हायला हवी. मी माझ्या पार्टी संदर्भात बोलेन महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलेन दुसऱ्या कोणत्या पक्षाविषयी बोलणार नाही. अजित पवार गोड माणूस आहेत एवढा गोड की सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि प्रेम करत राहतील. आम्ही नंतर केव्हाही भेटू शकतो, पवार साहेबांच टाइमटेबल मी घेऊन बसलेलो नाही. पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली की नाही याबाबतीत माहिती नाही. पण बाळासाहेब आंबेडकर यांच आम्ही स्वागत केलेलं आहे, असंही राऊत म्हणाले.
वाचा – ‘जबाबदारी कोणाची हा प्रश्नच नाही..’ खारघर घटनेवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले
अजित पवार काय म्हणाले होते?
संजय राऊत राष्ट्रवादीची भूमिका मीडियात मांडत असल्याने अजित पवार यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला होता. इतर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. पार्टीची मिटिंग जेव्हा होईल तेव्हा मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्या पक्षाविषयी सांगा ना, काय सांगायचं ते. तुमच्या पक्षाच्या मुखपत्राबद्दल बोला. पण आम्हाला कोट करून ते असं झालं, तसं झालं, फलानं झालं, असं सांगत आहेत. आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र कुणी घेण्याचं कारण नाही, असं अजित पवार म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.