मुंबई, 3 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा होण्याची शक्यता आहे. यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा निर्णय पक्षांतर्गत विषय आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व दिलं तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले थोरात?
तुमच्या शहरातून (मुंबई)
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर काँग्रेसकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा निर्णय हा पक्षांतर्गत विषय असतो. सुप्रिया सुळे यांना देशाचं नेतृत्व दिलं तर आंनदच होईल. महाराष्ट्राची लेक देशपातळीर अध्यक्ष झाली असे वाटेल असं थोरात यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना थोरात यांनी म्हटलं की मात्र शरद पवार यांनी पुढच्या काळातही राष्ट्रीय पातळीवर सक्रिय राहिलं पाहिजे. भाजपला विरोध असाच संघटित राहिला पाहिजे हीच अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
निवृत्तीवर प्रतिक्रिया
यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रश्न अंतर्गत असला तरी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा आहे. मात्र शरद पवार यांनी केवळ अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजकीय निवृत्ती घेतलेली नाहीये. सोनिया आणि राहुल गांधींना साथ देण्यात पवारांची महत्त्वाची भूमिका आहे. इथून पुढेही ही पुरोगामी विचाराची साथ कायम राहिल ही आमची अपेक्षा असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.