दिल्ली, 3 मे : स्वकर्तृत्व आणि संभाषण कौशल्याच्या जोरावर दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांनी पक्षात देशपातळीवर स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. जेव्हा केंद्रात एनडीएचं पहिल्यांदा सरकार आलं तेव्हा महाजनांकडे संरक्षण मंत्रिपदाची सूत्रं देण्यात आली. पण अटल बिहारी वाजपेयींचं हे सरकार केवळ 13 दिवसच टिकलं. दुसऱ्यांदा जेव्हा एनडीएची सत्ता आली तेव्हा महाजनांना राज्यसभेवर पाठवलं गेलं. त्यावेळी माहिती प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं. भाजपच्या तत्कालीन अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते.
महाजनांच्या निधनाचा धक्का
3 मे 2006 रोजी प्रमोद महाजन यांचं निधन झालं. या घटनेचा सर्वांत जास्त धक्का माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना बसला होता. प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध खूप घनिष्ठ होते. वाजपेयींचा महाजनांवर विश्वास होता. त्यांनी प्रमोद महाजन यांना लक्ष्मणाची उपमादेखील दिली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रमोद महाजन यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी जाणून घेऊया. `नवभारत टाइम्स`ने या विषयी माहिती दिली आहे.
22 एप्रिल 2006 रोजी भाजपचे वरिष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजन यांनी तीन गोळ्या झाडल्या. महाजन यांच्या वरळीतील घरी ही घटना घडली. त्यानंतर प्रमोद महाजन यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण 3 मे रोजी त्यांचे निधन झालं. महाजन यांना रुग्णालयात दाखल करताच राजकीय, चित्रपट आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली होती. भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रयाण केलं.
भाजपचे दिग्गज नेते
प्रमोद महाजन भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. ही घटना घडली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पाठदुखीने त्रस्त होते. पण त्याही स्थितीत ते मुंबईत पोहोचले. तत्कालीन उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या विमानाने वाजपेयी मुंबईत आले. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली मुंबईकडे रवाना झाले होते.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयपेयी आणि प्रमोद महाजन यांच्यातील मैत्रीचं नातं सर्वश्रुत होतं. ही घटना घडण्यापूर्वी सहा महिने वाजपेयींनी प्रमोद महाजन हे भाजपचे लक्ष्मण आहेत असं म्हटलं होतं. 2005 मध्ये भाजपच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमात बोलताना वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन ही पक्षातील राम-लक्ष्मणाची जोडी आहे, असं म्हटलं होतं. वाजपेयींच्या या वक्तव्याची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती.
सर्वात सक्रिय नेते
महाजन हे पक्षातील सर्वांत हायप्रोफाईल नेत्यांपैकी एक होते. पक्षाच्या दुसऱ्या पिढीतील नेत्यांमधील ते सर्वांत सक्रिय नेते होते. त्यांना देशभरातून ओळख मिळाली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना महाजनांनी स्वकर्तृत्वावर देशाच्या राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. राजकारणातील सूत्रधार हा शब्द केवळ महाजनांमुळे रुढ झाला होता. अडवाणींच्या रथयात्रेचे ते मुख्य सूत्रधार होते. उत्तम वक्ता आणि राजकारणी अशी त्यांची ओळख होती. महाजन नेहमी संसदेत वाजयपेयींच्या मागे बसत आणि गरजेवेळी त्यांना काही गोष्टी सांगत.
मोठी बातमी ! ‘राष्ट्रवादी मविआतून बाहेर पडणार’? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
भाजपसाठी संकटमोचक असलेले महाजन आपल्या भाषणांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीएला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी महाजन होते. पराभव होताच त्यांनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. वाजपेयी आणि महाजनांची अनोखी मैत्री राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असे.
प्रमोद महाजन यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच अटल बिहारी वाजपेयी मुंबईत दाखल झाले. त्यावेळी रुग्णालयातील स्थिती काहीशी वेगळी होती. अटल बिहारी वाजपेयींना पाहताच महाजन यांची कन्या पूनम वाजपेयींच्या पाया पडली. त्यावेळी वाजपेयींना ही अश्रू अनावर झाले. त्यांनी महाजन यांचा मुलगा राहुल याला मिठी मारत आधार दिला. या प्रसंगामुळे वाजपेयींना धक्का बसला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.