शारजाह, 25 मार्च : मोहम्मद नबीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्ताने पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. यासह त्यांनी टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या वहिल्या विजयाची नोंद केली. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्य दोन्ही संघातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी झाला. या सामन्यात राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या संघाने ६ विकेट राखून धूळ चारली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९२ धावाच केल्या. अफगाणिस्तानने ९३ धावांचे लक्ष्य १७.५ षटकात पूर्ण केलं.
अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने ३८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना २ विकेटही घेतल्या होत्या. या अष्टपैलू कामगिरीसाठी मोहम्मद नबीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ४ टी२० सामने झाले आहेत. या सामन्याआधी पाकिस्तानने सर्व सामने जिंकले होते. मात्र २४ मार्चला अफगाणिस्तानने पहिल्यांदा टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली.
पाकिस्तानचा संघ बाबर आझम, मोहम्मद रिजवान, हारिस रौफ आणि शाहिन आफ्रिदी यांच्या अनुपस्थितीत खेळत होता. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबर आझमच्या अनुपस्थितीत शादाब खानकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानने तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर संघाचा डाव सावरला नाही.
पाकिस्तानकडून इमाद वसीमने सर्वाधिक १८ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकी, मुजीब उर रहमान, मोहम्मद नबीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी एक एक विकेट घेतली. पाकिस्तानने २० षटकात ९ बाद ९२ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या ९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाची सुरुवात चांगली नव्हती. पाकिस्तानच्या संघाने पॉवर प्लेमध्ये तीन विकेट गमावल्या होत्या. पण मोहम्मद नबीने अनुभवाच्या जोरावर संघाचा डाव सावरला आणि विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.