धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 22 मे : महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. या संतांनी परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी अभंगांची निर्मिती केली. मराठी साहित्याला अभंगांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. आजही वेगवेगळ्या मंदिरात, हरिनाम सप्ताहात, आषाढी वारीमध्ये आपण अनेक अभंग ऐकतो. हे अभंग रॉकस्टाईलनं सादर करण्याचा प्रयोग मुंबईतील काही तरूण करतायत. त्यांची ही संकल्पना सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
काय आहे संकल्पना?
तुमच्या शहरातून (मुंबई)
दुष्यंत देवरुखकर, स्वप्निल तर्फे, अजय वाव्हळ, सतीश म्हस्के, पियुष आचार्य आणि विराज आचार्य या 6 तरुणांनी एकत्र येऊन अभंग रिपोस्ट हा बँड तयार केलाय. नऊ वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या एक स्पर्धेसाठी काही तरी हटके करण्याच्या उद्देशांनी त्यांनी हा बँड तयार केला. त्या स्पर्धेत त्यांची संकल्पना गाजली. त्याचबरोबर अन्य स्पर्धांमध्येही त्यांना यश मिळालं. या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी सोशल मी़डियावर हे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरूवात केली.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ‘सुंदर ते ध्यान’ ‘ दादला’ यासारखे अभंग तसंच भारुड त्याच्या मुळ स्वरुपाला धक्का न देता हे तरूण सादर करतात. विविध कार्यक्रमांमध्ये विशेष सादरीकरण करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येतं. अनेक फेस्टिव्हलही या तरूणांनी गाजवले असून दोनदा परदेशातही विठ्ठल नामाचा गजर केलाय.
उन्हाळ्याच्या सुट्टीत विठ्ठलनामात चिमुरडे दंग, मृदुंगाच्या साथीनं करतायत हरीनामाचा गजर, Video
बेस गिटार, एकोस्टिक गिटार, तबला, ड्रम्स,हार्मोनियम, वोकलिस्ट, यासारख्या वाद्यांचा वापर करून ही बँड अभंगांचे सादरीकरण करतो. ‘आजच्या तरुणांना जे संगीत माध्यम आवडतं त्या माध्यमातून संतांचे अभंग त्यांच्यापर्यंत पोहचावे, हा आमचा उद्देश आहे. आम्ही आत्तापर्यंत सुमारे 500 कार्यक्रम केले आहेत. या पद्धतीनं अभंग सादर करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव बँड आहे,’ अशी माहिती सहसंस्थापक स्वप्नीलनं दिलीय.
‘आम्ही अभंगाच्या माध्यमातून संतांना काय संदेश द्यायचा आहे, हे संमजून घेतो. त्यानंतर त्याच्या अर्थाला कुठंही धक्का न लावता त्याचे रुपांतर करून आम्ही तो सादर करतो. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, याचं जास्तीत जास्त साहित्य सर्वांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असं स्वप्नीलनं स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.