मुंबई, 25 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज 35 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज रिद्धिमान साहाची विकेट घेतली. परंतु याचा निर्णय देत असताना अंपायरकडून मोठी चूक घडली ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 25 एप्रिल रोजी मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरात संघाकडून शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा हे सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरले. यावेळी अर्जुन तेंडुलकर ने तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर रिद्धिमान साहाची विकेट घेऊन गुजरातला धक्का दिला. रिद्धिमान साहा केवळ 7 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. परंतु रिद्धिमान साहाला बाद ठरवताना मैदानावरील अंपायरकडून मोठी चूक घडली.
झालं असं की, अर्जुन तेंडुलकरने टाकलेला चेंडू रिद्धिमान साहाच्या ग्लोजला लागून मागे उभ्या असलेल्या विकेटकिपर ईशान शर्माने पकडला. अर्जुन विकेटसाठी अपील करताच मैदानावरील अंपायरने देखील रिद्धिमान साहा बाद असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविषयी रिद्धिमान साहाला शंका वाटली आणि त्यामुळे तो काही काळ मैदानातच उभा राहून DRS घ्यायचा का नाही? याबाबत विचार करत होता, परंतु या दरम्यान DRS घेण्याचा 15 सेकंदांचा वेळ संपून गेला. यानंतर ही रिद्धिमान साहाने अंपायरकडे DRS साठी अपील केले आणि DRS घेण्याचा वेळ निघून गेल्यावर देखील अंपायरने साहाची ही विनंती मान्य केली जे आयपीएलच्या नियमांत बसत नव्हते.
गुजरातने रिद्धिमान साहाची विकेट योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी DRS घेतला खरा परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. तिसऱ्या अंपायरने देखील रिद्धिमान साहा बाद असण्याचा निर्णय जाहीर केला आणि अखेर त्याला मैदानातून पुन्हा पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. परंतु DRS घेण्याची वेळ संपून देखील मैदानावरील अंपायरनी गुजरातला DRS घेण्याची परवानगी दिल्याने सध्या या निर्णयावर चाहते प्रश्न उपस्थित करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.