नवी दिल्ली, 26 मे : सध्या उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने तापमानाचा पारा चढला असून, साऱ्यांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहेत. यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने सर्वांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे. शिवाय, यंदा ‘एल-निनो’मुळे मान्सूनचं प्रमाण कमी राहणार असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात मान्सून सर्वसाधारण असेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान खात्याने नैर्ऋत्य मान्सूनबद्दलचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यात असं म्हटलं आहे की, जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे. त्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत चार टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतात. याचाच अर्थ असा, की भारतात सर्वसाधारण अर्थात सरासरीइतका पाऊस होणार आहे.
एप्रिल 2023मध्ये पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना भारतीय हवामान खात्याने असं म्हटलं होतं, की यंदा भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे; मात्र त्यात दीर्घकालीन सरासरीच्या 5 टक्के कमी-जास्त होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.
Weather Update : उकाड्यापासून दिलासा! राज्यात हलक्या सरींचा अंदाज, कमाल तापमानात होणार घट
सर्वसाधारण किंवा सरासरीइतक्या पाऊसमानाची व्याख्या निश्चित आहे. त्यानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत 50 वर्षांच्या सरासरी पाऊसमानाच्या 96 टक्के ते 104 टक्के पाऊस पडल्यास तो सर्वसाधारण किंवा सरासरीइतका समजला जातो. 50 वर्षांच्या हंगामांतलं सरासरी पर्जन्यमान 87 सेंटिमीटर (868.6 मिलिमीटर) इतकं आहे.
दरम्यान, एकंदर देशाचा विचार करता सरासरीइतका पाऊस यंदा पडणं अपेक्षित असलं, तरी वायव्य भारतात मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान अपेक्षित असल्याचं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
भारतीय हवामान खात्याने शास्त्रज्ञ डी. एस. पै यांनी सांगितलं, ‘देशात सगळीकडे सम प्रमाणात पावसाचं वितरण होणं ही आदर्श स्थिती आहे; मात्र प्रत्यक्षात तसं वितरण होत नाही. तरीही देशात सगळीकडे सारख्या प्रमाणात पाऊस झाला, तर या वर्षी शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाही.’
पॅसिफिक महासागराच्या पूर्वेकडच्या उष्णकटिबंधीय भागात महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान अवचितपणे वाढतं. त्याला एल निनो परिणाम असं म्हटलं जातं. एल निनो परिणाम घडून आला, तर भारतीय नैर्ऋत्य मान्सूनवर विपरीत परिणाम होतो, असं म्हटलं जातं. यंदा मान्सून हंगामात एल निनो परिणाम घडण्याची शक्यता आहे; मात्र एल निनो आणि मान्सून यांचा थेट संबंध नसल्याचं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.
नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून ही असते. यंदा तो उशिरा म्हणजे चार जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मान्सूनविषयक दोन दीर्घकालीन अंदाजांपैकी पहिला अंदाज अचूकतेच्या बाबतीत थोडा कमी असल्याचा इतिहास आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी झाला, तर साहजिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. कारण भारताची अर्थव्यवस्था अद्याप मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे.
Monsoon Update: दिलासादायक! राज्यात यादिवशी दाखल होणार मान्सून, पण एक चिंता वाढवणारी बातमी
नैर्ऋत्य मान्सूनमुळे भारताच्या निम्म्याहून अधिक क्षेत्रावरच्या शेतीला पाणी मिळतं. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सुमारे 60 टक्के भारतीयांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. देशातल्या निम्म्याहून अधिक शेतीक्षेत्राला सिंचनाची निश्चित सोय नाही. त्यामुळे भात, मका, ऊस, कापूस, सोयाबीन अशा महत्त्वाच्या पिकांच्या शेतीसाठी खरीप हंगामातला अर्थात जून ते सप्टेंबरमधला नैर्ऋत्य मान्सून पाऊस अत्यंत आवश्यक असतो. मान्सून पुरेसा झाल्यास साहजिकच पिकांचं उत्पादन वाढतं आणि अन्नधान्याच्या किमती घटून महागाई नियंत्रणात येते.
दरम्यान, यंदा एल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. तसंच, दुष्काळ पडण्याची शक्यता 60 टक्के असल्याचंही स्कायमेटने म्हटलं आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 94 टक्के पाऊस यंदा अपेक्षित असून, त्यात 5 टक्के कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा जून महिन्यात (जून 2023) देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के एवढाच पाऊस होण्याची शक्यताही भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. देशाच्या बहुतांश भागांत जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होण्याची शक्यता आहे; मात्र दक्षिण भारतातले काही भाग, वायव्य भारत, भारताच्या उत्तरेच्या टोकाकडचा भाग, तसंच ईशान्य भारताच्या काही भागांत जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.