मुंबई, 05 मार्च : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पिक पाण्यात वाहून गेलं आहे. त्यामुळे आता अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत चर्चा झाली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळं अवकाळी पाऊस हा आता नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरला जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणे आता शक्य होणार आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे पूर्ण
दरम्यान, राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण 1 लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.
(मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ठाकरे गट आता उतरणार रस्त्यावर, पोलिसांनी ‘या’ अटींसह दिली परवानगी)
4 ते 20 मार्च 2023 या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळपीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.