धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 20 एप्रिल : थंडी, ऊन-वारा असो की पाऊस हातगाडी, सायकल आणि लोकलमधून मुंबईकरांना न चुकता वेळेवर आणि योग्य ठिकाणी जेवण पोहोचवणारे डबेवाले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली “मुंबईचा डबेवाला’ ही सुविधा आजही तितक्यात नेटाने सुरू आहे. डबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. मुंबईतील मुलुंड परिसरात राहणारे बबन रामू सावळे हे गेल्या 56 वर्षांपासून डबा पोहोचविण्याचे काम करत आहेत. आज त्यांचं वय 70 वर्ष असून ते आजही तरुणांनाही लाजवेल असं काम उत्साहानं करतात.
चौदाव्या वर्षी डबेवाला म्हणून आपलं काम सुरू
तुमच्या शहरातून (मुंबई)
बबन सावळे हे मूळचे मावळ तालुक्यातील दिवाळी या गावचे रहिवासी मात्र घरची परिस्थिती हलगीच असल्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. हलाकीची परिस्थिती असल्यामुळे मुंबईत येण्यासाठी तिकीट काढण्यापुरते देखील पैसे बबन यांच्याकडे नव्हते. त्यामुळे चुलत भावानेच पाच रुपयाचे तिकीट काढून गाठीशी काही पैसे देऊन मुंबईला आणलं. मुंबईत आल्यानंतर वयाचा चौदाव्या वर्षी त्यांनी डबेवाला म्हणून आपलं काम सुरू केलं. डोक्यावर गांधी टोपी, सफेद झब्बा कुर्ता आणि सायकल घेऊन डबे पोहोचविण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. हे करता करता आज तब्बल वय वर्ष 70 झाले असले तरी हा प्रवास थांबला नाही.
मुंबई येण्याचा निर्णय घ्यावा लागला
घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्याकारणाने मुंबई येण्याचा निर्णय घ्यावा लागला. गावी तीन एकर शेती होती. मात्र, कुटुंबात सदस्य संख्या जास्त असल्यामुळे गाव सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घ्यावा लागला. चार बहिणी एक भाऊ आई वडील यांची जबाबदारी माझ्यावर होती. अनेक वेळेस डबा पोहोचवताना तहानभूक विसरून ग्राहकांची भूक भागवण्यासाठी ऊन वारा पाऊस थंडी या परिस्थितीत काम करावे लागते. अनेक वेळेस सकाळी केलेला नाष्ट्यानंतर थेट रात्री घरी पोहोचल्यावरच जेवण करावे लागते. या नोकरीच्या आधारावर बहिणींची लग्न लावली घरची परिस्थिती सांभाळली. जरी नोकरी केली नसती तर हातची तीन एकर जमीनही गेली असती आणि दोन वेळेसच्या जेवणाचे वांदे देखील झाले असते, असं बबन सावळे सांगतात.
ग्राहक काळजी घेतात
डबेवाला म्हणून सुरुवातीला काम करताना आणि आत्ताची परिस्थिती फार बदललेली आहे. पूर्वी आम्हाला डबे डोक्यावर घेऊन पोहोचावे लागत होते मात्र, आता सायकल हातगाडी लोकल ट्रेन असे विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. अनेक वेळेस सायकल खराब झाल्यावर पायपीट करून देखील डबा पोहोचवा लागत होता. आज वय वर्ष 70 असलं तरी सायकल चालवून मुंबईतील विविध ठिकाणी डबे पोहचवण्याचे काम करत आहे. सायकल चालवली नाही तर करमत नाही. तसेच ग्राहकांबरोबर एवढ्या वर्षांचे ऋणानुबंध असल्यामुळे अनेक ग्राहक आज काम करताना काळजी देखील घेतात, असंही बबन सावळे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.