धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 2 मे : उन्हाळा म्हटलं की आंबा आलाच. त्यातही खवय्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतो तो कोकणातला हापूस. हापूसची चव चाखल्याशिवाय आंब्याचा सीझन साजरा होऊच शकत नाही. यामुळे मुंबई आणि ठाण्यातील लोकांना कोकणातल्या हापूस आंब्याची चव चाखता यावी यासाठी सुहास निंबकर यांनी कोकणातला हापूस आंबा उपलब्ध करून दिलेला आहे. आईनं पाठवलेल्या आंब्याच्या एका पेटी पासून सुरू केलेला सुहास निंबकर यांचा आंब्याचा व्यवसाय आता चांगलाच नावारूपाला आला असून या ठिकाणी मुंबई आणि ठाण्यातील लोक आंबे खरेदीसाठी गर्दी करत असतात.
कशी झाली सुरुवात?
तुमच्या शहरातून (मुंबई)
1977-78 च्या वेळी सुहास निंबकर हे रत्नागिरी येथून शिक्षण आणि नोकरी करीत मुंबईत आले. काम करत असताना पैश्याची अडचण निर्माण झाल्याने आणखी काही तरी करण्याची गरज भासली. त्याच वेळी 1980 च्या सुमारास सुहास यांच्या आईनं आंब्याची एक पेटी सुहास यांना मुंबईला पाठवली. गावावरून मुंबईला आलेले आंबे सुहास यांनी मित्र मंडळी, नातेवाईक, कामाच्या ठिकाणी वाटले. त्या आंब्याचे त्यांना पैसे मिळाले आणि सुहास यांना कल्पना सुचली ती आंबे विक्रीच्या व्यवसायाची आणि तिथून निंबकर बंधू हापूसवाले या नावाने व्यवसाय सुरू झाला.
काय आहे किंमत?
1985- 86 मध्ये ठाण्यातील तलाव पाळी या ठिकाणी सुहास यांना मित्राची जागा मिळाली. आईनं पाठवलेल्या एक पेटी आंब्याच रूपांतर व्यवसायात झालं. आज निंबकर हे ठाण्यातील गोखले रोड येथे तीन ते चार महिने व्यवसाय करून चार ते पाच हजार आंब्याच्या पेट्या विक्री करतात. यामधून त्यांना लाखोंची कमाई होते. ठाण्यातील गोखले रोड नवपाडा शिवाजीनगर या ठिकाणी निंबकर बंधू या नावाने कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा विकला जातो. रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंबा, पायरी आंबा याठिकाणी मिळतो. आंब्याच्या किंमती या 700 रुपयांपासून सुरू होऊन 1800 पर्यंत आंबे या ठिकाणी मिळतात. तर 1 पेटीचा दर हा चार ते पाच हजार रुपयांच्या जवळ पास आहे.
नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे ग्राहकांसाठी उपलब्ध
परिस्थिती मुळे आईने पाठवलेली आंब्याची पेटी मित्र मंडळी आणि सहकाऱ्यांना दिली. त्यांना आंब्याची चव आवडली आणि मागणी वाढल्यामुळे या व्यवसायाची कल्पना सुचली. गेल्या चाळीस एक वर्षांपासून रत्नागिरी देवगड येथील नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे ग्राहकांसाठी ते उपलब्ध करून देत आहोत. या व्यवसायात आता मला मुलगा विराज आणि मुलगी वेदांका मदत करतात, असं सुहास निंबकर यांनी सांगितले.
नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video
चांगला प्रतिसाद
बाबांनी सुरू केलेल्या व्यवसायाला ठाण्यासह मुंबईतील बऱ्याच ठिकाणाहून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. आंब्या सोबत कोकणातील सुका मेवा यामध्ये ओले काजू, कोकम, पापड, मसाले, सरबत, आटले, फणस, आमरस, या गोष्टी देखील यांच्याकडे मिळतात. लोकांना या ठीकणी आल्यावर कोकणात आल्या सारखं वाटतं कारण एकाच छताखाली कोकणातील गोष्टी इथे मिळतात, असं वेदांका निंबकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.