प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 12 मे : आयुष्याच्या रिंगणात परिस्थिती कितीही खडतर असली तरी जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर त्या परिस्थितीला जबरदस्त ‘फाईट’ देता येते. कुणी कल्पनाही केली नसेल अशी यशोगाथा घडवता येते, हे पुण्यातील चंद्रिका पुजारी या दहावीत शिकणाऱ्या मुलीनं दाखवून दिलंय. पुणे शहरातील ताडीवाला झोपडपट्टीत राहणाऱ्या चंद्रिकानं लहान वयात मोठ्यांना प्रेरणा मिळेल, असं काम केलं आहे.
परिस्थितीशी फाईट!
तुमच्या शहरातून (पुणे)
चंद्रिकानं नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत ‘बेस्ट चॅलेंजर’ हा पुरस्कार पटकावलाय. त्याचबरोबर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल घेऊन इतिहास रचलाय. दहा बाय दहाच्या झोपडीत राहणाऱ्या प्रियांकानं सिल्व्हर मेडलपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितलाय.
चंद्रिकाचे वडील ऑफिस बॉय म्हणून काम करतात. तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करते. तिला लहानपणापासूनच बॉक्सिंगचे आकर्षण होते. त्यामधूनच चंद्रिकानं 2019 साली ‘युवा विकास मंच बॉक्सिंग अकादमी’ जॉईन केली. या अकादमीमध्ये तिनं कमी कालावधीमध्ये स्वत:ची छाप पाडली.
चंद्रिकाच्या या यशात तिचे कोच जयंत शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला खडतर प्रशिक्षण दिलं. बॉक्सिंगची आवड असल्यानं तिला हे प्रशिक्षण फारसं जड गेलं नाही. 2021 साली तिची गोव्यातील स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यावेळी या स्पर्धेत खेळण्यात घरच्यांचा विरोध होता. पण, शिंदे सरांनी समजावल्यानंतर घरच्यांनी परवानगी दिली, अशी आठवण चंद्रिकानं सांगितली.
सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारण्याआधी हे जाणून घ्या, नाहीतर…, VIDEO
देशातील क्रीडापटूंना प्रशिक्षण देणाऱ्या ‘साई’ या संस्थेत चंद्रिका आता बॉक्सिंगचे पुढील धडे गिरवत आहे. देशाला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून देण्याचं तिचं ध्येय आहे. ‘चंद्रिकाला बॉक्सिंगचा ध्यास आहे. घरी आल्यानंतरही ती स्वस्थ बसत नाही. मुलीला बॉक्सिंग शिकावावं का? ती बॉक्सिंग शिकून काय करणार ? असा आम्हाला प्रश्न होता. पण, आम्ही सर्वांनी विचार करुन तिला हा खेळ शिकवण्याचं धाडस केलं. तिची यामधील प्रगती पाहून आनंद होतोय. अशी भावना चंद्रिकाचे वडिल ऋषी पुजारी यांनी व्यक्त केलीय. तर चंद्रिकानं आपल्या परिसराचं आणि घराचं नाव उंचावलंय, असं तिच्या मावशीनं सांगितलं.
बॉक्सिंगचे रिंगण असो की आयुष्याचे मैदान खिलाडू वृत्ती असेल तर कुठल्याही परिस्थितीशी लढत देऊन विजयाचे उत्तुंग शिखर गाठता येते हेच चंद्रिका पुजारीनं दाखवून दिलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.