गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. मात्र आज संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सिल्व्हर ओकला दाखल झाले. संतप्त एसटी कर्मचारी शरद पवारांच्या निवासस्थानी सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शरद पवार, अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. एसटी विलिनीकरणासाठी ११७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शरद पवारांच्या घरावर आंदोलन होत असल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते पवारांच्या घराबाहेर जमले. यावेळी राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनीच कर्मचाऱ्यांनाच भडकावून शरद पवारांच्या घरी हल्ला करण्यास सांगितले. अनेक कर्मचारी दारू पिऊन याठिकाणी आले होते.सदावर्तेंना आम्ही सोडणार नाही. हिंमत असेल तर त्यांनी येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी केले. आझाद मैदानावर संप चालू होता. सरकारशी बोलणी सुरू होती. कोर्टात प्रकरण आहे. कर्मचाऱ्यांना बोलण्याची संधी दिली होती.मात्र याप्रकारचा हल्ला खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले असून राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत . बघूया कोण काय म्हणाले .
पंकजा मुंडे – गेली अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते.सरकारला हा विषय नीट हाताळता आला नाही. आतापर्यंतच्या इतिहासात ज्येष्ठ नेत्याच्या घरी हल्ला झाला नव्हता.सरकारने संबंधित मंत्र्यांनी हा विषय हाताळायला हवा होता. मात्र तसे झाले नाही असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ – एस टी कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे, गेली कित्येक महिने आपण संपावर आहेत आपल्या जवळपास सर्व मागण्या मंजूर केल्या. हायकोर्टाने प्रत्येकवेळा तुम्हाला सांगितलं काही मार्ग सुचवलं एवढं सगळं झाल्यानंतर पवार साहेबांच्या घरावर जाण्याचा काही कारण नव्हतं. एवढ्या सगळ्या लोकांना पर्मनंट करणं शक्य नव्हतं हे हायकोर्टाने नेमलेल्या समितीने सांगितलेलं होत ते कामगारांना ही मान्य होतं. एवढा पगार दिला तर विकासकामांना एक रुपयाही शिल्लक राहणार नाही. तरीही पैसे वाढवून दिले. मात्र तरीही अशाप्रकारे पवार साहेबांच्या घरावर जाणं निंदनीय आहे. यांचे बोलविते धनी हे वेगळे असण्याची शक्यता आहे. पवार साहेबांच्या अंगावर जाणं योग्य नाही.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील –एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे.
संजय राऊत – आजची घटना दुर्दैवी आहे. पडद्यामागून वातवरण बिघडवण्याचा प्रयत्न केले आहे. आजचे आंदोलन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नव्हते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
प्रवीण दरेकर – एसटी कर्मचाऱ्यांना गेली पाच महिने दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लढू किंवा मरू या स्थितीत कर्मचारी असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत .या सगळ्या परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे. पवार साहेब यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याने एसटी कर्मचारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा पवार साहेब यांच्या घरी गेले असतील असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मत व्यक्त केलंय.120 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकारला गांभीर्य नाही, विषय कोर्टात असताना कठोर कारवाईची भाषा केली, हा मग्रूरपणामुळे कर्मचारी हतबल, त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर पर्याय उरला नाही, म्हणून हातात चप्पल शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन. दगडाच्या काळजाचं सरकार आहे.