आज आणि उद्या भारत बंदची हाक देण्यात आली असून याचा परिणाम बँकिंग आणि वाहतुकीसह विविध सेवांवर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसाच्या या संपामुळे बँकिंगसह वाहतुकीसारख्या विविध सेवांना फटका बसणार आहे.
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हा भारत बंद पुकारला आहे. मोदी सरकारच्या धोरणांचा कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर वाईट परिणाम होत आहे. या विरोधातच हा संप पुकारण्यात आला असून या संपात बँकिंग क्षेत्रही सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात आणि बँकिंग सुधारणा कायदा 2021 विरोधात या संघटना संपात सहभागी होणार आहेत.
संपाबाबत 8 ठळक मुद्दे
- केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त संघाची 22 मार्च 2022 रोजी दिल्ली येथे बैठक झाली. यामध्ये 28-29 मार्च 2022 रोजी विविध राज्ये आणि क्षेत्रातील दोन दिवसीय अखिल भारतीय संपाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शासनाची धोरणे ही सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक परिवहन आणि वीज कर्मचाऱ्यांनी संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
३. वीज कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. परंतु, राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना मेस्सा लागू केला असून राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना प्रस्तावित संप करण्यास मनाई करण्यात आली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात मेस्मा लागू करण्यात आला आहे.
- बँकिंग आणि विम्यासह आर्थिक क्षेत्र देखील या संपाला पाठिंबा देणार आहेत.
- कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर, तांबे, बँका, विमा यांसारख्या क्षेत्रातील संघटनांनाही संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- SBI ने सांगितले आहे की, संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, बँकेच्या शाखा आणि कार्यालयांमध्ये नियमित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचं एसबीआयने म्हटले आहे.
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय आणि बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक-2021 च्या निषेधार्थ हा संप करण्यात येत आहे.
- देशभरातील शेकडो ठिकाणी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील संघटना संपाच्या समर्थनार्थ बंद करणार आहेत.