सिडको, ता.12:
यंदाची महापालिका निवडणूक चुरशीची होणार याचा प्रत्यय आतापासून येऊ लागला आहे. प्रभागरचनेवर एकीकडे हरकती सुरू असताना काही नेत्यांनी प्रचारातदेखील आघाडी घेणे सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. यातदेखील शिवसेनेने आघाडी घेतल्याचे सिडको परिसरात प्रामुख्याने दिसून आले.
शिवसेनेचे युवा नेते दीपक बडगुजर, शीतल भामरे आणि रत्नमाला राणे यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींना सुरवात केली. त्यामुळे आतापासून इलेक्शन फिव्हर दिसून येत आहे. पैकी शीतल भामरे या माजी आणि रत्नमाला राणे या विद्यमान नगरसेविका आहेत. नागरिकांशी संवाद साधत सूचना जाणून घेण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी हे दौरे असल्याचे या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शहर विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम लोकांपुढे मांडले जात आहेत. आत्तापासून सुरू झालेला हा इलेक्शन फिव्हर टिकवून ठेवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असले तरी भाजपलादेखील आता शिवसेनेपाठोपाठ जनसंपर्क अभियान सुरू करावे लागेल, यातून चुरस अधिक वाढण्याची चिन्हे सिडको विभागात दिसून येत आहेत.