टोकिया, 21 मे : लग्नानंतर लोक जबाबदाऱ्यांच्या बंधनांत बांधले जातात, असं मानलं जातं. ते अविवाहित लोकांप्रमाणे स्वतंत्र राहून जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जगातले अनेक लोक लग्न करण्याऐवजी अविवाहित राहणं पसंत करत आहेत. यामध्ये अनेक सेलेब्रिटींचाही समावेश आहे. पण लग्न करुनही अविवाहित व्यक्तीप्रमाणे एकल जीवन जगण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही जाऊ देणार का? यावर अनेकांचे उत्तर अजिबात नाही असंच असेल. अशीच एक संकल्पना सध्या जपानमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. जपानमध्ये वीकेंड मॅरेज नावाचा लग्नाचा एक नवीन ट्रेंड आला आहे. या ट्रेंडनुसार, लोक लग्न करतात आणि सिंगल लाइफदेखील एन्जॉय करतात. जपानी लोकांचा सर्वाधिक कल असणारा हा नवीन ट्रेंड नेमका कसा आहे, या विषयी जाणून घेऊया.
वीकेंड मॅरेजमध्ये, विवाहित जोडपी फक्त वीकेंडला एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात आणि सर्व कमिटमेंट्स पूर्ण करतात. उर्वरित आठवड्यात ते स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगतात. यामुळे जोडप्यांना लग्नानंतरही एकल जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. ज्या जोडप्यांची आवड आणि जीवनशैली वेगवेगळी आहे, त्यांच्यासाठी हा ट्रेंड उत्कृष्ट ठरत आहे. आठवडाभर येथील जोडपी आपल्या इच्छेनुसार जीवन जगतात आणि वीकेंडला एकमेकांच्या इच्छेनुसार काम करतात. ही संकल्पना स्वीकारल्यानंतर जोडप्यांना एकमेकांच्या जीवनशैलीचं पालन करण्याची गरज नाही.
भांडणं होतात कमी, एकमेकांसोबत घालवतात अमूल्य वेळ
वीकेंड मॅरेज संकल्पना स्वीकारणारी जोडपी एकमेकांसोबत कमी वेळ घालवतात. त्यामुळे भांडणं, वादविवादाची शक्यता कमी होते. जेव्हा जोडपी आठवडाभरानंतर भेटतात तेव्हा ती त्या दोन दिवसांत जास्त रोमँटिक होतात. नेहमी सोबत असणाऱ्या जोडप्यांना एकमेकांशी बोलायला फारसा वेळ आणि विषय नसतात. आठवडाभरानंतर जेव्हा अशी जोडपी एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्याकडे एकमेकांना सांगण्यासारखं खूप काही असतं. ते त्यांच्या आयुष्यातील मजेदार आणि आव्हानात्मक घटना एकमेकांशी शेअर करू शकतात. अशा प्रकारे ते एकमेकांबरोबर अमूल्य वेळ घालवू शकतात. जोडीदाराशी जवळीक साधण्याचा आणि आपलेपणा जपण्याचा हा एक उत्तम मार्ग असल्याचे सिद्ध होत आहे.
बाँडिंग मजबूत होतं, ऊर्जा वाढते
जेव्हा विवाहित जोडपी वीकेंड मॅरेजची संकल्पना स्वीकारतात, तेव्हा ते एकमेकांसोबत अधिक चांगला वेळ घालवू शकतात. कारण दोघंही ऊर्जेने परिपूर्ण असतात.आठवड्याच्या शेवटी कामाचं किंवा अन्य जबाबदाऱ्यांचं ओझं कमी असतं आणि कामात व्यस्त राहण्याची शक्यताही कमी असते. असं मानलं जातं की, दोन दिवसांत जोडप्याच्या नात्याचे बंध मजबूत होतात, जे सात दिवस एकत्र राहूनही शक्य होत नाही. ही संकल्पना स्वीकारलेली जोडपी वीकेंडला एकमेकांशी मनापासून कनेक्ट होतात आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घेतात. या संकल्पनेत लोकांना पर्सनल स्पेस मिळते आणि ते त्यांची सर्व कामं अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.