मुंबई, 17 एप्रिल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत पक्षात बंड केल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरेच्या सोबतचे अनेक सहकारी शिंदे गटात सहभागी झालेत. अगदी कुटुंबातील सदस्यांनाही शिंदेंना बळ दिलं आहे. अशातच आता आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आदित्यंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले ठाकरे गटाचे शिवबंधन सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अमेय घोले यांच्यासोबत वडाळा विधानसभेतील ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिंदेंना पाठींबा देणार असल्याचं कळते. मागील अनेक दिवसांपासून अमेय घोले हे ठाकरे गटात नाराज होते. आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला कंटाळून घोलेंनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार घोलेंनी आपल्या विविध उपक्रमाच्या बॅनरवून पक्षाचे नेते नाव व चिन्ही टाकणं बंद केलं होतं. एकूणच या पक्ष प्रवेशाची कुणकुण मातोश्रीला लागल्यानंतर वडाळा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची तातडीती बैठक आज सेनाभवनला बोलवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
ठाकरेंना दिल्ली उच्च न्यायालायाचे समन्स
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज दिल्ली उच्च न्यायालायत हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने समन्स बजावत 17 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आज सुनावणी पार पडणार आहे.
वाचा – सकाळी वैद्यनाथाची पूजा अन् दुपारी मुंबईकडे कूच, अजितदादांचा ‘वजीर’ निघाला…
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टात 28 मार्चला सुनावणी पार पडली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावत 17 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.