मुंबई, 4 एप्रिल : जगप्रसिद्ध टी 20 क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सिजनला सुरुवात झाली आहे. आयपीएलचे रोमांचक सामने पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेडियममध्ये गर्दी करत असून आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूला चिअर करण्यासाठी विविध गोष्टी करत असतात. परंतु आता आयपीएल सामन्यादरम्यान वादग्रस्त विषयांवरील पोस्टर्स झळकावणं प्रेक्षकांना महागात पडू शकत.
आयपीएल सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांकरिता आयपीएलच्या फ्रँचायझींनी ‘प्रतिबंधित वस्तू’ची यादी प्रसिद्ध केली आहे. याअंतर्गत सामन्यादरम्यान पोस्टर्स झळकावणाऱ्या प्रेक्षकांना कडक इशारा देण्यात आलं आहे. स्टेडियमवर राजकीय विषयांशी संबंधित वादग्रस्त पोस्टर झळकावण्यावर फ्रँचायझींनी बंदी घातली आहे. या अंतर्गत प्रेक्षकांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) शी संबंधित कोणत्याही प्रकारचे बॅनर स्टेडियममध्ये नेण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा नियम दिल्ली, मोहाली, हैदराबाद आणि अहमदाबाद या चार शहरांमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी असणार आहे तसेच या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.
पीटीआयच्या माहितीनुसार, आयपीएलच्या फ्रँचायझी होम ग्राउंडवरील सामन्याची तिकीट विक्री संदर्भात व्यवस्था पाहात असतात. तेव्हा आयपीएलच्या सामन्यांमधून सामाजिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. तसेच सामन्याला कोणत्याही प्रकारे राजकीय वळण मिळू नये याकरता हे नियम घातल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकासाठी फिफाने देखील अशाच प्रकारचे नियम घातले होते. फिफा विश्वचषकात राजकीय, धार्मिक, वैयक्तिक किंवा कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजीवर बंदी घालण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.