मुंबई, 23 मे : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल या टी-20 क्रिकेट स्पर्धेत दरवर्षी अनेक नवीन खेळाडू चमकत असतात. या स्पर्धेतील त्यांच्या खेळीमुळे त्यांच्या करिअरला दिशाही मिळते. यंदाही अनेक नवोदित खेळाडूंनी आपल्या अप्रतिम खेळीने चाहत्यांची मनं जिंकली व दिग्गज खेळाडूंचं लक्ष वेधून घेतलं. यापैकीच एक नाव म्हणजे मुंबई इंडियन्स टीमचा दमदार खेळाडू आकाश मधवाल होय.
चार वर्षांपूर्वी 29 वर्षीय आकाश मधवाल उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. तो 2019 मध्ये ट्रायल्समध्ये सहभागी झाला आणि त्याच्या खेळाने उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक वसीम जाफर आणि सध्याचे कोच मनीष झा यांचं लक्ष वेधून घेतलं. वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत रेड बॉलने कधीच क्रिकेट न खेळलेला आकाश आयपीएलमध्ये खेळणारा उत्तराखंड राज्य क्रिकेट टीममधील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. आकाशचं सिलेक्शन व गेल्या चार वर्षांमध्ये त्याच्या खेळात झालेले बदल याबद्दल त्याचे कोच मनीष झा व अवतारसिंग यांनी माहिती दिली आहे.
उत्तराखंडचे मुख्य कोच झा ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाले, “जेव्हा तो 2019 मध्ये ट्रायल्ससाठी आला. तेव्हा त्याचा खेळ पाहून आम्ही सर्वजण खूप प्रभावित झालो. स्मूद अॅक्शनसह तो चपळ आणि वेगवान आहे. त्याच्यात एक एक्स-फॅक्टर होता. वसीमभाईने त्याचं टॅलेंट ओळखलं व ताबडतोब सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत कर्नाटक विरुद्ध सामना खेळवला. तो चांगला खेळाडू होता पण त्याची तयारी कमी दिसत होती. पुढच्या वर्षी कोरोना काळात जेव्हा रणजी ट्रॉफी रद्द झाली आणि मी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा मी त्याला सांगितलं की तो तिन्ही फॉरमॅट खेळेल, मग त्याने रन्स केले तरी चालतील. मी त्याला आश्वासन दिलं होतं की त्याला सर्व सामने खेळायला मिळतील.”
“तो टेनिस बॉल क्रिकेट खूप खेळत असल्याने त्याचा स्पीड चांगला होता, पण तो अचूक नव्हता. तो त्याच्या बॉलिंगवर खूप प्रयोग करत असे. त्यामुळे माझी काळजी फक्त एवढीच होती की, जर तुम्हाला वेगवान आणि स्ट्रेट बॉलिंग करता येत असेल, तर तुम्ही हळू बॉलिंग का करत आहात. आम्ही त्याला जे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ते हळूहळू त्याला कळू लागले आणि त्याचा परिणाम आता तुम्ही पाहू शकता,” असं झा पुढे म्हणाले.
गेल्या वर्षी सूर्यकुमार यादवला दुखापत झाली. त्याची रिप्लेसमेंट म्हणून आकाश मधवाल मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि आता तो रोहित शर्माचा गो-टू बॉलर बनला आहे, मग तो नवीन चेंडू असो किंवा शेवटच्या ओव्हरमध्ये असो. मागच्या आठवड्यात त्याने रिद्धिमान साहा, शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट घेत गेल्या वर्षीचा विजेता गुजरात टायटन्सविरुद्ध नवीन बॉलने आपलं कौशल्य दाखवलं. रविवारी दुपारी तो डेथ ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सचा तारणहार बनला, जेव्हा सनरायझर्स हैदराबाद एकूण 220 पेक्षा जास्त रन्स करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते.
मधवालने सर्वात आधी विव्रत शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्यातील 140 रन्सची सलामीची पार्टनरशीप मोडली. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने अग्रवालची विकेट घेतली. यानंतरही त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये त्याच्या अप्रतिम बॉलिंगची झलक दाखवली. त्याने फॉर्ममध्ये असलेल्या हेनरिक क्लासेनला माघारी पाठवलं आणि त्यानंतर हॅरी ब्रूकच्या विकेटसाठी त्याने टो-क्रशिंग यॉर्कर टाकला.
या वर्षीच्या डोमेस्टिक सीझनच्या पार्श्वभूमीवर मधवालला उत्तराखंड व्हाईट-बॉल टीमचा कॅप्टन बनवण्यात आलं. हे त्याने कमी वेळेत वेगाने केलेल्या सुधारणांमुळे झालं, असं त्याच्या कोचना वाटतं. “सर्व खेळाडू मेहनती आहेत पण त्यांच्या स्वभावात फरक असतो. गेल्या वर्षी मी मधवालला व्हाईट बॉलचा कॅप्टन बनवल्यानंतर त्याने त्यासाठी खूप मेहनत करत चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये तो नव्या बॉलने बॉलिंग करण्यास तयार असतो, असं पाहायला मिळतं. गुजरात टायटन्सविरुद्ध आणि आता सनरायझर्सविरुद्धच्या डेथ ओव्हर्समध्ये त्याने नवीन बॉलचा उत्तम वापर केला. त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना पाहून खूप आनंद होतो. तो येत्या काळात उत्तराखंडमधील अनेक तरुणांसाठी एक आदर्श बनेल,” असं मनीष झा म्हणाले.
आकाश मधवाल व ऋषभ पंत यांच्यात एक कनेक्शन आहे. रुरकीमधील धांडेरा इथला रहिवासी असलेला मधवाल हा भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शेजारी आहे आणि त्याने क्रिकेटमध्ये स्वारस्य दाखवण्यापूर्वी इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. अवतार सिंग यांच्या हाताखाली त्याने आपली कौशल्ये विकसित केली. अवतार सिंग यांनीच ऋषभ पंतला दिल्लीला जाण्यापूर्वी प्रशिक्षण दिलं होतं. “आकाशचे घर ऋषभच्या घरासमोर आहे. ते शेजारी आहेत. दिवंगत तारक सिन्हा सरांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्लीला जाण्यापूर्वी ऋषभ माझ्या हाताखाली क्रिकेट खेळला आहे,” असं अवतार सिंग म्हणाले.
2013 मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत आकाश मधवालने आपले वडील गमावले. त्याचे वडील भारतीय सैन्यात होते. “आकाश त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होता, तो इंजिनीअरींग करत होता आणि फक्त छंद, आवड म्हणून क्रिकेट खेळत होता. उत्तराखंड रणजी ट्रॉफीमध्ये खेळत नसल्याने त्याचे मुख्य लक्ष टेनिस बॉल क्रिकेटवर होते. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याचा खूप दरारा होता,” असं अवतारसिंग म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.