जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
पुणे, 3 एप्रिल : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी आजचा वार हा अपघात वार ठरला आहे. तालुक्यात एकाच तासात दोन वेगवेगळे अपघात घडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अवघ्या पाच किलोमीटर अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात घडले. या घटनांमुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे, बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार अशी मृतांची नांवे आहेत. यातील धातुंडे हे इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील रहिवासी आहेत तर कोकरे आणि कुंभार हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत.
जंक्शन येथे सकाळी नऊ वाजता कळस रस्त्यावरील खरजुलवस्ती परिसरात टाटा इंट्रा व सायकलचा अपघात झाला. या अपघातात भरणेवाडी येथील मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. धातुंडे हे आपल्या सायकलने शेतातून घरी निघाले होते. या दरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या टाटा इंट्रा गाडीने धातुंडे यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे.
वाचा – पुढचे दोन आठवडे सूर्य आग ओकणार, हवामान खात्याकडून महत्त्वाची सूचना
तर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्यावर शेळगाव हद्दीत क्रेन आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार यांचा मृत्यु झाला असून हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. यातील कोकरे हे पाटस येथील साखर कारखान्यातून निवृत्त झाले होते. त्यामुळे आपली पेन्शन काढण्यासाठी सकाळी दुचाकीवरून पाटसकडे निघाले होते.
शेळगाव येथून जात असताना समोरून येत असलेल्या क्रेन चालकाने क्रेन विरुद्ध दिशेने थेट अंगावर आणल्याने दुचाकी क्रेनखाली गेली. त्यामुळे अपघात होऊन त्यामध्ये कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कुंभार यांना उपचारासाठी इंदापूर येथे नेले असताना त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.