मुंबई, 08 मे: यूपीपीसीएस परीक्षा ही उत्तर प्रदेश सरकारतर्फे घेतली जाणारी कठीण स्पर्धा परीक्षा आहे. काही वेळा उमेदवारांना ही परीक्षा पास होण्यासाठी अनेक वर्षं लागतात. पण एका महिला उमेदवारानं पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन विजयाची नवी गाथा लिहिली आहे. शशिकला वर्मा असं त्यांच नावं आहे. आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेश सरकारमध्ये अधिकारी असणाऱ्या शशिकला वर्मा यांच्या यशस्वी प्रवासाबद्दल माहिती देणार आहोत. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
शशिकला वर्मा या उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकारी आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीपीसीएस परीक्षा उत्तीर्ण केली होती. एकेकाळी त्या इतरांसमोर बोलतानाही थरथर कापत होत्या. घरच्यांशी बोलायलासुद्धा त्यांना संकोच वाटत असे. त्यांचे वडील सैन्यात होते. त्यांनी मुलीची ही कमतरता ओळखली, व त्यानंतर त्यांनी शशिकला यांना अशा ट्रॅकवर नेलं की, त्यांनी यूपीपीसीएसचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या मंडळाच्या सदस्यांनाही स्वतः च्या उत्तरांनी आश्चर्यचकित केलं. पण जेव्हा शशिकला यांनी ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा अनेक टोमणे ऐकायला मिळाले. एवढ्या रात्री उशिरा कोणतं कोचिंग चालतं?, असेही काही जण म्हणाले, तर हिच्या घरच्यांना मुलीची कमाई खायची आहे, असे टोमणे काहींनी मारले. मात्र, शशिकला यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून यूपीपीसीएस परीक्षेची तयारी सुरू ठेवली, व पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सगळ्यांचीच बोलती बंद केली.
सुरुवातीला शशिकला यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. तेव्हा वर्गामध्ये एका विद्यार्थ्यानं त्यांना सांगितलं की, मॅडम, तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्ही अधिकारी का होत नाही? यानंतर शशिकला यांनी पहिल्यांदा यूपीपीसीएसचा अभ्यासक्रम पाहिला. त्यांना प्री, मेन्स आणि नंतर इंटरव्ह्यू ही परीक्षेची पद्धत खूप अवघड वाटली. मात्र, माघार घेतल्यास मुलांना काय शिकवणार, असा प्रश्न त्यांना पडला. यानंतर त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली. याबाबत त्यांनी वडिलांशी चर्चा केली. वडिलांनी शशिकला यांना एका कोचिंग क्लासमध्ये नेलं. या वेळी शशिकला व त्यांच्या कुटुंबियांना खूप टोमणे ऐकायला मिळाले. काही लोक म्हणाले की, मुलगी 30 वर्षांची आहे, तिचे लग्न करून टाका. एवढ्या रात्री उशिरा कोणतं कोचिंग असतं?, असेही टोमणे काहीजणांनी मारले.
अभ्यासावर दिलं लक्ष
या सर्व गोष्टींकडे शशिकला यांनी दुर्लक्ष केलं, व यूपीपीसीएस परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी सुरुवातीपासूनच प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी केली. जेव्हा त्या मेन परीक्षा क्लिअर झाल्या आणि इंटरव्ह्यूसाठी गेल्या, तेव्हा त्यांच्या आधी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आलेली मुलगी त्यांना रडत येताना दिसली. शशिकला यांनी इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित उत्तरं दिली; पण जेव्हा त्या तfथून बाहेर पडत होत्या, तेव्हा इंटरव्ह्यू घेणाऱ्या एका सदस्यानं म्हटलं की, मला पुढील वर्षी शशिकला हिला इथे पुन्हा भेटायला आवडेल. पण, शशिकला यांनी उत्तर दिलं, मी निवड झाल्यानंतर नक्कीच भेटायला येईन, निकाल आला तेव्हा तिनं पहिल्याच प्रयत्नात यूपीपीसीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.
तुम्हीही FREE मध्ये Internship करण्याचा विचार करताय? जरा थांबा; ‘हा’ रिपोर्ट बघून लागेल 440V झटका
एकेकाळी इतरांसमोर बोलण्याचा नव्हता आत्मविश्वास
शशिकला या बलिया जिल्ह्यातील असनवर गावच्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारच्या वित्त आणि लेखा विभागात ट्रेझरी ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांचे आजोबा शेतकरी होते. वडील सैन्यात होते. वडिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगमुळे शशिकला यांनी अनेक शाळा बदलल्या. आर्मी स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. अभ्यासात त्या हुशार होत्या. पण, त्यांना इतरांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास नव्हता. इतरांसमोर बोलताना त्या अनेकदा अडखळत होत्या. त्यांच्या शिक्षकांकडून ही बाब वडिलांना समजली. त्यांनी ती गांभीर्याने घेतली, आणि शशिकला यांना एनसीसीमध्ये सहभागी होण्यास सांगितलं. एनसीसीचा त्यांना नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी फायदा झाला. पण, त्यांना नीट बोलता येत नव्हतं, याचा त्यांना खूप संकोच वाटत होता. एकदा तर एनसीसीमध्ये त्यांना ‘परेड सावधान’ आज्ञा देण्यास सांगितलं गेलं, तेव्हा त्यांना ती देता आली नव्हती, व घाबरून त्यांनी एनसीसी सोडण्याचा हट्ट केला.
बारावीच्या फेअरवेलमध्येही असचं काहीसं घडलं. फेअरवेलच्या वेळी शशिकला यांना सर्वांसमोर बोलण्यास सांगितलं. मात्र, त्या एक ओळही बोलू शकल्या नाहीत. ग्रॅज्युएशन करतानासुद्धा त्यांना ही समस्या जाणवत होती. अनेकदा प्रॅक्टिकल परीक्षेत येत असूनही प्राध्यापकांना त्यांना उत्तर देता येत नव्हती. पुढे त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये एमएस्सी केलं. पण, आत्मविश्वासाचा अभाव आणि संकोचानं त्याची पाठ सोडली नाही. अनेकदा सेमिनारमध्ये प्रेझेंटेशन देताना हातपाय थरथर कापत होते. कसंबसं त्या पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या. त्यानंतर नेट परीक्षा देण्याऐवजी वडिलांनी शशिकला यांना आर्मी बीएडसाठी आर्मी सेंटर ऑफ एज्युकेशन (पंचमढी) येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना शशिकला इतरांसमोर आत्मविश्वासानं बोलत नाही, या उणिवेची जाणीव होती. शशिकला लष्करी वातावरणात राहून बालपणातील ही कमतरता दूर करू शकेल, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. आर्मी बीएडसाठी पाठवतानाही त्यांनी शशिकला यांना सांगितलं होतं की, हे बदल वर्षभरानंतरच पाहायला मिळतील. तेव्हा शशिकला खूप रडल्या होत्या. तीन महिने त्या घरच्यांशी बोलल्या नव्हत्या.
बी.एड चा झाला फायदा
बी.एड चे शिक्षण घेत असताना शशिकला यांच्यासोबत असणाऱ्या सर्व मुली सीडीएस (कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस) परीक्षेला बसणार होत्या. पण, केवळ इंटरव्ह्यू असल्यानं शशिकला या परीक्षेला बसल्या नव्हत्या. बी.एड करीत असताना त्यांनी अध्यापन कौशल्ये आत्मसात केली. संवाद कौशल्यावरही काम केलं. पण, आत्मविश्वासानं इतरांसमोर बोलण्याची झुंज सुरूच होती. अखेर एकदा वादविवाद स्पर्धा होती. शशिकला यांच्या मैत्रिणीनं त्यांना न सांगता त्यांचं नाव स्पर्धेसाठी दिलं होतं. त्या बोलायला स्टेजवर आल्या तेव्हा, त्यांना काहीच सूचत नव्हत. तेव्हा स्पर्धेच्या आधी त्यांच्या मैत्रिणीनं एक सल्ला दिला होता, जो त्यांच्यासाठी मोलाचा ठरला. तो सल्ला होती की, स्टेजवर बोलताना फक्त विचार करायचा की समोर कोणी नाही, फक्त तू एकटी असतेस, व बोलत जायचे. ही टिप त्या दिवशी त्यांना खूप उपयोगी पडली. त्या वादविवाद स्पर्धेत त्यांना दुसरा क्रमांक मिळाला, व अवघ्या एका वर्षात त्यांचं व्यक्तिमत्त्वच बदलून गेलं.
IPS Success Story: 12वी झाले नापास, वेळप्रसंगी रस्त्यावरही झोपले अन् झाले सिंघम; दबंग ऑफिसरची कहाणी
शिक्षिका म्हणून लागली होती नोकरी
बी.एड झाल्यानंतर शशिकला यांनी शिक्षण विभागात सहायक शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. तिथे त्या मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात भरपूर सहभागी करून घेत होत्या. कारण त्या स्वतः ज्या त्रासातून गेल्या होत्या, त्यातून मुलांनी जाऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. नागरी सेवेत रुजू होण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता. या परीक्षांबाबत त्यांना फारसी माहितीसुद्धा नव्हती. पण एके दिवशी वर्गातील मुलांशी बोलत असताना त्यांनी विचारलं की, त्यांना काय करायचं आहे? त्यावेळी एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, मी भविष्यात पानाचं दुकान उघडणार आहे. यावर शशिकला म्हणाल्या, तुम्हाला डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक किंवा शाळेत येणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्यासारखं अधिकारी व्हावंसं वाटत नाही का? तेव्हा त्यातील एक विद्यार्थी म्हणाला की, ‘मॅडम, तुम्ही सुशिक्षित आहात. तुम्ही स्वतः अधिकारी का होत नाही.’
वर्गातील या प्रसंगानंतर शशिकला यांनी अधिकारी होण्याचा निश्चय केला, व त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीपीसीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.