धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 27 एप्रिल : शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला घेऊन देशभरातील पालक मुंबईमधील पर्यटन स्थळाला भेटी देतात. या भेटी दरम्यान मुंबईतील राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय येथे भेट देणे म्हणजे लहान मुलांसाठी मोठी पर्वणीच असते. या बागेत विविध प्रकारची दुर्मिळ झाडे, वेगवेगळे प्राणी आणि पक्षी मुलांना पाहिला मिळतात. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीचा तुम्ही या ठिकाणी मनसोक्त आनंद तुम्ही घेवू शकता.
काय पाहता येईल?
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबईत भायखळा येथे राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय आहे. सुमारे 52 एकर जागेवर हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. यात विविध प्राणी, पक्षी आणि दुर्मिळ झाडे आहेत. राणीच्या बागेत विशेषतः वाघ हा आकर्षणाचं केंद्र आहे. वाघासाठी कृत्रिम तलावही तयार करण्यात आला आहे. कित्येकदा या तलावात वाघ पोहताना दिसतो. तलावात वाघ पोहोतानाचे दृष्य दिसणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच असते.
वॉक थ्रू सुविधेसह प्रदर्शनी
नवीन पक्ष्यांच्या नंदनवनात वॉक थ्रू सुविधेसह तयार केलेली प्रदर्शनी आहे. काचेच्या प्रदर्शन गॅलरीमधून आतील तयार करण्यात आलेले नैसर्गिक अधिवास, पक्ष्यांकरिता विविध झाडे-झुडपे, घरटी तयार करण्याच्या जागा, खेळणी, पाणी पिण्याच्या सुविधा इत्यादी पाहता येतात. या प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पाणपक्षी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. तसेच विविध प्रकारची पुरातन झाडे, वेगवेगळे प्राणी, पक्षी, कासवे ,साप, बिबट्या, कोल्हा असे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत. तर राणीच्या बागेत पेंग्विनही मुख्य आकर्षण आहे.
सर्व सुविधा पर्यटकांसाठी खुल्या
2017 पासून आधुनिकीकरणाचा प्रकल्प सुरू झाला. यामध्ये सर्व प्रथम आले ते पेंग्विन त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली. त्याकाळात राणीच्या बागेचे विकासकाम सुरू होतं. तर 2020 मध्ये या सर्व सुविधा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. आधी राणीच्या बागेत असणारे प्राणी हे बंद पिंजऱ्यात होते. सिमेंट काँक्रिटच फ्लोरिंग होतं. मात्र, आता त्यांना मोकळ्या अधिवासात ठेवण्यात आलं आहे. जे काही नवीन बदल झाले आहेत त्यामध्ये काचेच्या प्रदर्शनी निर्माण करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक अधिवासात निर्माण करण्यात आला जेणेकरून प्राण्यांना जंगलात असल्याचा भास होतो.
तसेच काचेची प्रदर्शनी असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी त्या प्राण्याला काही खायला देऊ नये तसेच कोणीही आत जाऊ नये या सर्व गोष्टी आता बंद झाल्या. कारण काच असल्यामुळे पर्यटकांना अगदी जवळून या प्राण्यांना पाहण्याची संधी मिळते. फक्त एका काचेच अंतर असतं. मुळात प्राणी संग्रहालय हे पर्यटनाचे क्षेत्र आहेत पण सर्वात प्रथम शैक्षणिक क्षेत्र आहे, असं येथे जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करणारे डॉ. अभिषेक नंदकिशोर नीलम साटम यांनी सांगितले.
राणीच्या बागेत 64 लहान उद्यान
तसेच संपूर्ण राणीच्या बागेत एकूण 64 लहान उद्यान आहेत. त्यानंतर 6,611 ही 256 जातीची वेगवेगळ्या वनस्पती आहेत. जी जगभरातल्या वेगवेगळ्या 6 खंडातल्या वनस्पती तुम्ही येथे येऊन पाहू शकतात. पूर्वी रांग लावून तिकीट काढावे लागत होतं. मात्र, गेल्या वर्षीपासून ऑनलाईन तिकीट सेवा सुरू केली आहे. मायबीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन येण्याच्या चार ते पाच दिवस आधी देखील तुम्ही तिकीट बुक करू शकतात. तसेच बुधवारी हे प्राणी संग्रहालय बंद असून शुक्रवारी बारा वर्षे खालील मुलांसाठी, अपंग व्यक्तींसाठी मोफत तर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तिकिटमध्ये सवलत दिली जाते, असंही डॉ. अभिषेक नंदकिशोर नीलम साटम यांनी सांगितले.
असे आहे तिकिटाचे दर
या बागेत प्रवेश करण्यासाठी चार जणांचे कुटुंब- 100 रुपये (आई, वडिल आणि दोन मुलं, तिसऱ्या अपत्यासाठी अधिकचे 25 रुपये भरावे लागणार) प्रौढ- 50 रुपये, परदेशी पर्यटक- 400 रुपये, खासगी शाळेतील विद्यार्थी- 15 रुपये, ज्येष्ठ नागरिक- मोफत, तीन वर्षाखालील मुलं- मोफत जावू शकतात. ( ऑनलाईन बुकींग लिंक : https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ )
गूगल मॅपवरून साभार
कुठे आहे राणीची बाग?
लोकल ट्रेनने मध्य रेल्वेच्या भायखळा या स्थानकावर उतरायचे. भायखळा स्टेशनपासून पूर्व दिशेने बाहेर पडल्यानंतर डावीकडे चालत अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर राणीची बाग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.