साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 26 एप्रिल : उष्ण तापमानात शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला थंड पेय पितो. मात्र बाजारात मिळणारी थंड पेय अनेकदा आरोग्यास हितकारक ठरतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांपैकी एक घटक सध्या लोकांनी आवर्जून वापरण्याची गरज आहे. तो म्हणजे वाळा. बहुगुणी आणि उष्णतेच्या विकारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करणाऱ्या वाळा या घटकाबद्दल माहिती असणे हे आजकाल आवश्यकच आहे.
वाळा ही खरंतर एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आजकाल प्रत्येकाच्या घरी फ्रिजचा वापर वाढला आहे. त्यामुळे लोक मातीचा माठ आणि वाळा वापरायला विसरत चालले आहेत. पण पूर्वी जेव्हा फ्रीज नव्हते, त्या काळात लोक शरीराला नैसर्गिकरीत्या आतून थंडावा मिळवून देण्यासाठी हा वाळा वापरत होते. त्यामुळे कडक उन्हाळ्यात देखील तुम्ही वाळ्याचे थंडावा देणारे पाणी पिऊन उन्हामुळे होणाऱ्या विविध त्रास आणि आजारांपासून स्वतःचे संरक्षण नक्कीच करू शकता.
तुमच्या शहरातून (कोल्हापूर)
काय आहे वाळा ही वनस्पती?
खरंतर 100 टक्के भारतीय असणाऱ्या या वाळ्याचे शास्त्रीय नाव व्हेटिव्हेरिया झिझानिओइड्स असे आहे. गवती चहाप्रमाणे दिसणाऱ्या वाळ्याची पाने भरपूर लांब असतात. साधारण एक ते दीड फुटांच्या आसपास ही वनस्पती उंच वाढते. तर जास्त सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी आढळून येते. मात्र या वाळ्याच्या गवताची नीट वाढ होऊन ते काढणीसाठी येण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी द्यावा लागतो, असे आयुर्वेदीक डॉक्टर अनिल वैद्य यांनी सांगितले आहे.
काय आहेत वाळ्याचे फायदे
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जर वाळ्याचे सेवन केले तर आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. त्यापैकी काही पुढील प्रमाणे आहेत.
1) उन्हाळ्यात मातीच्या माठात वाळा टाकून ते पाणी पिल्यास पाण्याला तर छान सुगंध येतोच, मात्र पाण्यातील दोष देखील निघून जातात.
2) शरीराला थंडावा देणाऱ्या वाळ्याच्या पाण्यामुळे शरीरातील उष्णतेचे विकार दूर होण्यास मदत होते.
3) बऱ्याचदा घरी या वाळ्याचे पडदे आणि वस्तू बनवले जातात. त्यावर पाणी मारले जाते, जेणेकरून घरी नैसर्गिक थंडावा मिळेल.
4) वाळ्याचे चूर्ण वापरल्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीच्या, मूत्रपिंडाच्या आजारांसाठी नक्कीच फायदा होतो.
5) मूत्र विसर्जनावेळी आग, जळजळ होणे, प्रमाण कमी होणे आदी समस्यावर देखील या वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.
6) उष्णतेमुळे अंगावर घामोळ्या उठणे, पित्त उठणे, त्वचेवर लाल चट्टे येणे आदी समस्यांवर देखील वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात.
7) उन्हाळ्यात अंगाला घाम जास्त येत असल्यास, तसे घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे.
8) ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार होत असतो. त्यांच्यासाठी वाळा ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. वाळ्याच्या पाण्यामुळे पोटात होणारा गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो, असंही डॉक्टर अनिल वैद्य सांगतात.
घरातील तेलाची गरज भागवण्यासाठी पिता-पुत्रांनी शोधली आयडिया, तुम्हीही घेणार का आदर्श? Video
अशा पद्धतीने वापरावा वाळा
वाळ्याची एक जुडी विकत आणून आपण वापरू शकतो. घरातील पिण्याच्या माठात ही जुडी आपण टाकून ठेवू शकतो. एक जुडी साधारण 3 दिवस पाण्यात चांगली राहू शकते. त्यानंतर माठ आणि त्यातील जुडी वाळवून घ्यावे, पुन्हा तीच वाळ्याची जुडी माठाच्या पाण्यात टाकून आपण वापरू शकतो. अशा पद्धतीने साधारण 20 ते 25 दिवस वाळ्याची एक जुडी वापरू शकतो, असे वाळ्याची विक्री करणाऱ्या दुकानदाराने सांगितले.
अशा पद्धतीने आपण आयुर्वेदातील घटकाचा वापर करून उन्हाळ्यात आपल्या शरीराला आणि परिणामी आपल्या मनाला थंडावा मिळवून देऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.