नवी दिल्ली, 20 मे : लवकरच देशभरातील लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्याने (IMD) येत्या काही दिवसांत भारताच्या बहुतांश भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पुढील तीन दिवस पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
ताज्या IMD बुलेटिननुसार, उत्तर प्रदेशच्या काही भागात सोमवारपर्यंत, राजस्थान आणि मध्य प्रदेशात उद्या म्हणजेच रविवारपर्यंत आणि छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मंगळवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पुढील पाच दिवसांत आर्द्र हवा आणि उच्च तापमानामुळे कोकण भागात तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे.
पुढील 5 दिवस हवामान खात्याचा अंदाज
ईशान्य भारत- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 5 दिवसांत ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात 20 ते 24 मे दरम्यान आणि 24 मे रोजी त्रिपुरा आणि मिझोराममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व भारत – पुढील 5 दिवसांत प्रदेशाच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. 20, 23 आणि 24 मे रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
वाचा – दिवसभर शेतात काम केलं अन् संध्याकाळी गेला जीव; जळगावात उष्माघाताचा आणखी एक बळी
उत्तर पश्चिम भारत – 22 आणि 23 मे रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आणि 23 मे रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 मे ते 24 मे दरम्यान राजस्थानच्या विविध भागात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.
ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने 23 ते 25 मे दरम्यान विखुरलेला पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मध्य भारत – पुढील 5 दिवसांत छत्तीसगडमध्ये गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 22 आणि 23 मे रोजी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारत – पुढील पाच दिवसांत प्रदेशाच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.