नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 24 एप्रिल : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून उष्णतेची लाट पसरली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. अत्यंत गरम होणे, घामोळया येणे, अस्वस्थ वाटणे असे अनेक त्रास होत आहेत. यामुळे या उष्माघातापासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.
शरीराला किती तापमान योग्य?
तुमच्या शहरातून (पुणे)
आपल्या शरीराला 36.8 अंश एवढे तापमान हे योग्य तापमान मानले जाते. या तापमानामध्ये आपल्या शरीराची चयापचयक्रिया आणि सर्व अवयव व्यवस्थित कार्यरत होतात. पण जेव्हा यापेक्षा अधिक तापमान आपल्या शरीराचे वाढते त्यावेळेस मेंदूतर्फे आपल्या रक्तवाहिन्यांना प्रसरण पावण्याची आज्ञा दिली जाते आणि यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर घाम येण्यास सुरुवात होते.
हा घाम येणे म्हणजे आपल्या शरीरातील पाणी बाहेर टाकून आपले शरीर थंड करण्याचं काम केले जाते. मात्र, आपल्या शरीरातून सतत घाम गेल्यामुळे आपल्या शरीरातील पाणी संपत जातं आणि यामुळे आपले मूत्राशय, मेंदू, डोळ्याकडील भाग आणि इतर अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. यामध्ये माणसाला चक्कर येऊन पडणे आणि त्यानंतर माणसे दगावण्यासारखे मोठे अपघात होऊ शकतात, असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे कोणती?
उष्माघात ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपले तोंड कोरडे पडते. लघवी कमी प्रमाणात होते. यावेळेस आपल्याला चक्कर येते तसेच संभ्रमावस्था निर्माण होते. ही उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे आहेत.
Skin care: उन्हाळ्यात तेलकट त्वचा सतावतेय? या चुका टाळल्या तरी परिणाम दिसेल
उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?
यासाठी उपाय म्हणून एक तर उन्हामध्ये बाहेर पडू नये. जर उन्हात बाहेर पडण्याची वेळ आली तर डोक्यावर टोपी घालावी, छत्री घेणे, त्यासोबतच सैलसर पांढरी कपडे वापरणे. कपडे शक्यतो सुती असावी. त्यासोबत दिवसभरामध्ये कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त क्षार आहे असे लिंबू पाणी, लस्सी, कोकम सरबत अशी पेय प्यावीत. तसेच ओआरएस देखील घेणे आवश्यक असते. या सर्वांची काळजी घेऊन आपण उन्हामध्ये बाहेर पडावे, असंही डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.