मुंबई, 19 एप्रिल : देशाच्या बहुतांश भागांत तापमापकाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (बीएमसी) मंगळवारी नागरिकांसाठी उष्माघात आणि उष्णतेसंबंधी इतर समस्यांपासून वाचण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.
नवी मुंबईत 16 एप्रिल रोजी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उन्हाचा तडाखा आणि डिहायड्रेशनमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 13 झाली आहे. हा कार्यक्रम नवी मुंबईतील खारघर परिसरातील मोकळ्या मैदानात पार पडला होता आणि त्यात लाखो लोकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर उष्माघातामुळे एकाच दिवशी 600 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षांत उष्णतेच्या लाटेमुळे एकूण 31 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, रायगड आणि राज्याच्या किनारपट्टीवरील काही जिल्हे उष्णतेच्या लाटेत सर्वाधिक प्रभावित झालेले आहेत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
तापमानात झालेली वाढ पाहता बीएमसी प्रशासनानं नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. ती खालीलप्रमाणे:
– स्वत:ला हायड्रेट ठेवा.
– फिक्या रंगाचे कपडे घाला. उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
– प्रवास करताना पाणी आणि कांदे सोबत ठेवा.
– अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स पिणं टाळा कारण यामुळे डिहायड्रेशन होतं.
– हाय प्रोटिन्स आणि फ्रोझन अन्न पदार्थ खाणं टाळा.
– तुम्ही काही कामासाठी घराबाहेर पडत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा. बाहेर पडताना शक्यतो सुती कापडानं डोकं आणि चेहरा झाका.
– लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांना बंदिस्त वाहनांमध्ये ठेवून जाऊ नका.
– जर तुम्हाला अशक्तपणा आल्यासारखं किंवा आजारी असल्यासारखं वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
– ओआरएस, लस्सी, राईस वॉटर, लिंबाचं सरबत, ताक, नारळपाणी इत्यादींचं नियमित सेवन करत रहा कारण यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
– जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
– पंखे, पडदे, शटर किंवा सनशेड वापरून तुमचं घर थंड ठेवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
हिटस्ट्रोक झाल्यास काय करावं?
– संबंधित व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी घेऊन जा. त्या व्यक्तीचे हातपाय थंड पाण्यानं धुवा. व्यक्तीच्या शरीराचं तापमान कमी करणं आवश्यक असल्यानं त्या व्यक्तीच्या डोक्यावर साधं पाणी ओता.
– संबंधित व्यक्तीला ओआरएस, लिंबाचं सरबत, राईस वॉटर किंवा शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी जे काही गरजेचं असेल ते द्या.
– संबंधित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात म्हणजेच हिटस्ट्रोक हा जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.