वसई, 24 एप्रिल : काही दिवसांपूर्वी ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब पीडित महिलेची भेट घेतली होती. या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आता दुसरी एक घटना समोर आली आहे. शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यानी हल्ला करून चव्हाण यांना मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात 14 मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनेसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा हल्ला केल्याचे मनसैनिकांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
शिवेसना ठाकरे गटातर्फे शुक्रवारी वालीवच्या प्रभाग समिती ‘जी’ च्या कार्यालयावर पाणी टंचाईविरोधातम मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला वेळ दिला नाही. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲड अनिल चव्हाण यांनी मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना भेटायला वेळ असतो असे सांगून अपशब्द काढले. त्याचा राग मनात धरून मनसेचे स्थानिक पदाधिकारी प्रवीण भोईर, पंकज सावंत आदींसह 14 जणांनी रविवारी संध्याकाळी चव्हाण यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली. यावेळी चव्हाण यांच्या कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली. याप्रकरणी ॲड चव्हाण यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मनसेचे प्रवीण भोईर, पंकज सावंत, अमित पाटील, रवी पाटेकर यांच्यासह 10 अनोळखी जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्याप्रकरणी सोमवार संध्याकाळ पर्यंत कुणाला अटक करण्यात आलेली नव्हती.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.