पुणे, 7 मे : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रकट मुलाखतीत राज ठाकरे यांनी अजित पवारांना काकांकडे लक्ष द्या, असा सल्ला दिला होता. यावर अजित पवारांनीही राज ठाकरेंना टोला लगावला होता. अशातच काल राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत असताना अजित पवारांवर टीका केली. तसेच त्यांची मिमिक्रीही केली. याबाबत आज अजित पवारांना प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते? मिमिक्री हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. कारण जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांनी मागे एकदा निवडणुकीत 14 आमदार निवडून आणले. दुसऱ्यांदा फक्त एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरदराव सोनावणेंनी त्यांचे तिकीट घेतले म्हणून तेवढी एक पाटी लागली. नंतर आमचे कल्याणचे सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्यासोबत जे लोक होते त्यांपैकी काही लोक सोडले तर सगळे त्यांच्यापासून दूर गेले आहेत. राज ठाकरेंना त्यांचा पक्ष वाढविण्याऐवजी अजित पवारची मिमिक्री करणे आणि अजित पवारचे व्यंगचित्र काढणे यात समाधान वाटते आहे. यामधून राज ठाकरे समाधानी होत असतील, तर त्यांना शुभेच्छा, असे म्हणत अजित पवार यांनी ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
वाचा – राजीनामास्त्रानंतर पवार पहिल्यांदाच विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरातून पुनश्च हरी ओम!
राज ठाकरे काय म्हणाले होते?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, शरद पवार यांना राजीनामा द्यायचा होता. मात्र, अजित पवार हे शरद पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी जसे वागत होते, ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिले. ‘ए तू गप्प बस’, ‘ए तू शांत बस’, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असे सगळे त्यांचे सुरू होते. हे सगळे पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होते.
अजित पवार जे काही वागले ते सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आले असणार, अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवार) असा वागतोय. खरेच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मलापण म्हणेल, ए गप्प बस. त्या भीतीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको, असे म्हणत त्यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.