छत्रपती संभाजीनगर, 06 मे : ऑनलाइन गेममध्ये पैसे गमवल्याने चिंतेत असलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर गौरव चंद्रकांत पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौरवने मेकॅनिकल डिप्लोमाचं शिक्षण घेतलं होतं. त्याचे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. गौरव एका खासगी कंपनीत नोकरीला होता. दोन बहिणी आणि गौरव अशी तीन भावंडे होती. गेल्या काही दिवसांपासून गौरवला ऑनलाइन गेम खेळण्याची सवय लागली होती. या गेममध्ये आपण ५० हजार रुपये हरल्याची माहिती गौरवने घरच्यांना दिली होती. तेव्हा हरलेले पैसे भरण्यासाठी गौरवला मामाने चाळीस हजार रुपये दिले होते. पण तरीही गौरव तणावाखाली राहत होता.
देवदर्शनाहून परतताना कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाचा घाला
तुमच्या शहरातून (छ. संभाजीनगर)
गौरवने शुक्रवारी घरी वडिलांसोबतच जेवण केलं. त्यानंतर आई वडिलांना बीडला जायला पाठवलं. तर गौरव दुपारी हर्सूल तलाव परिसरात गेला. तिथे काही वेळ काठावर बसल्यानंतर अचानक तलावात उडी मारली. तलावात तरुणाने उडी मारल्याची बाब सुरक्षारक्षक राजेश गवळे यांना समजली. त्यांनी याबाबतची माहिती हर्सूल पोलिसांना दिली. पोलिसांनी गौरवला तलावातून बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
गौरवच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्याचा मृतदेह पाहून आई,वडील आणि बहिणींनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. एकुलता एक मुलगा गमावल्यानं कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.