नवी दिल्ली 21 एप्रिल : तुम्हीही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपवरून खाद्यपदार्थ ऑर्डर करत असाल तर सावधान. कारण ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करणं तुम्हाला महागातही पडू शकतं. दिल्लीला लागून असलेल्या सायबर सिटी गुरुग्राममध्ये फूड डिलिव्हरी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सेक्टर 46 च्या पॉश भागात स्विगी कंपनीचा डिलिव्हरी बॉय मोमोज डिलिव्हरी करण्यासाठी पोहोचला होता.
तिथून निघताना त्याने शू रॅकची झडती घेतली आणि त्याच्या आवडीचे 10 हजार रुपये किमतीचे महागडे शूज चोरून पळ काढला. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सेक्टर 46 च्या घराच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने 15 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता स्विगीवरुन तंदूरी मोमोज मागवले. दुपारी 2 वाजता फूड डिलिव्हरी बॉयने तंदुरी मोमोजचं पॅकेट आणलं. परत जाताना डिलिव्हरी बॉयची नजर तळमजल्यावरील शू रॅकवर पडली.
त्यानंतर त्याने शू रॅकची झडती घेण्यास सुरुवात केली आणि शू रॅकमधून 10,000 रुपये किमतीचे शूज उचलून निघून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा डिलिव्हरी बॉय शू रॅकमधून अशा प्रकारे शूज उचलचाना दिसतो, जणू हे कोणाच्या लक्षात येणार नाही. मात्र त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार, याची त्याला कल्पना नव्हती.
तळमजल्यावर राहणारा मनोज दुसऱ्या दिवशी शू रॅकमधून बूट काढण्यासाठी आला तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली. पीडित व्यक्तीने फूड डिलिव्हरी कंपनीला अनेक वेळा तक्रार मेल केली आणि ग्राहक हेल्पलाइनवरही तक्रार केली. मात्र, कारवाई झाली नाही.
स्विगीकडे तक्रार करूनही आरोपी रायडरकडून ना शूज जप्त केले गेले ना त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली. त्यानंतर या व्यक्तीने या चोरीच्या घटनेची तक्रार सेक्टर 50 पोलीस ठाण्यात दिली. या घटनेनंतर पीडित तरुणाने ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्यांना असं आवाहन केलं, की घराबाहेर दारातच डिलिव्हरी घ्या. कोणत्याही परिस्थितीत डिलिव्हरी करणार्याला घरात बोलावू नका, अन्यथा तुम्हीही या स्विगी चोराचा बळी होऊ शकता.
डिलिव्हरी बॉयने ज्या पद्धतीने शूज चोरले, ते पाहून असं वाटतं, की तो मोठी चोरीही करू शकतो. आता याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहावे लागेल. शूज चोरीला गेलेल्या व्यक्तीचं म्हणणे आहे की, ही केवळ बूट चोरीची किरकोळ घटना नसून ग्राहक आणि स्विगी सारख्या ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांवरील विश्वासाचा विषय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.