मुंबई, 09 एप्रिल : आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होऊन आठवड्याभराचा कालावधी झालाय. यामध्ये प्रत्येक संघाचे जवळपास दोन ते तीन सामने झाले असून पॉइंट टेबलमध्येही आता चढाओढ दिसून येते. दरम्यान, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांना अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅप देण्यात येते. शनिवारी झालेल्या दोन सामन्यांच्या आधी ऋतुराज गायकवाडकडे ऑरेंज कॅप होती. पण एका दिवसात ती इतर दोघांकडे गेली आणि शेवटी पुन्हा ऋतुराजकडेच राहिली.
शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पहिला सामना झाला. यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने ७९ धावांची खेळी केली. या खेळीसह ऑरेंज कॅप त्याच्याकडे आली. दरम्यान, त्याच सामन्यात दुसऱ्या डावात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६५ धावांची खेळी करत बटलरला मागे टाकलं आणि ऑरेंज कॅप पटकावली. पण वॉर्नरचा हा मान फार काळ टिकला नाही.
आम्ही 5 ट्रॉफी जिंकल्या तेव्हा….; सलग सामने गमावल्याच्या प्रश्नावर रोहित शर्माची नाराजी
डबल हेडरमधला दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होता. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाबाद ४० धावा केल्या. ऋतुराजने ४० धावा करताच ऑरेंज कॅप पुन्हा त्याच्याकडे आली. दिवसभरात इतर दोघांनी घातलेली ऑरेंज कॅप दिवसाच्या शेवटी ऋतुराजच्याच डोक्यावर होती.
ऋतुराज गायकवाडच्या ३ सामन्यात १८९ धावा झाल्या आहेत. यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या डेव्हिड वॉर्नरने तीन सामन्यात १५८ धावा केल्यात. त्यानेही दोन अर्धशतके केली आहेत. राजस्थानकडून खेळणाऱ्या जोस बटलरने तीन सामन्यात दोन अर्धशतकांसह १५२ धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.