मुंबई, 04 मे : अभिनेत्री कंगना रणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यात सातत्यानं वाद विवाद पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा जावेद अख्तर यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय. 2020 साली झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने जावेद अख्तर यांच्याकडून मला धमकी येत असल्याचा आरोप केला होता. जावेद अख्तर यांनी पहिल्यांदा या मुलाखतीकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण काही महिन्यांनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने पुन्हा एकदा हा विषय छेडला आणि जावेद अख्तर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असा आरोप केला. कंगनाच्या या वक्तव्यानंतर जावेद अख्तर यांनी कोर्टात केस केली आणि या केसवर 3 मे रोजी सुनावणी झाली. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी कंगनावर चांगलाच निशाणा साधला आहे.
मजिस्ट्रेट कोर्टात आपली बाजू मांडत जावेद अख्तर यांनी म्हटलं, “कंगनाच्या आरोपांनंतर माझ्यावर प्रचंड दबाव आला. मला अपमानास्पद वाटत होतं. लोकांनी देखील मला ते विसरू दिलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब होती. त्यामुळेच मला कंगनाविरोधात तक्रार दाखल करावी लागली होती”
हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्यावर प्रेम, 43 व्या वर्षी केलं दुसरं लग्न, आता असं आयुष्य जगतेय पूजा बत्रा
जावेद अख्तर पुढे म्हणाले, “हा माझा अपमान आहे. मी लखनऊमधून आहे. आमच्या इथे तू नाही तर आप असं बोललं जातं. कोणीही माझ्यापेक्षा 30-40 वर्षांनी लहान असेल तरीही मी त्यांना आप म्हणूनच संबोधतो. मी माझ्या वकिलांना देखील आजपर्यंत तू अशी हाक मारली नाहीये. आतापर्यंत माझ्यावर जे आरोप करण्यात आलेत ते खरे नाहीत”.
“फेब्रुवारी 2020मध्ये कंगनाने एका मुलाखतीत माझ्यावर आरोप केले आणि त्याच्या काही महिन्यांनी सुशांत सिंहचं निधन झालं. त्यानंतर कंगनाने हा चर्चेचा विषय बनवला. मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. याचा अर्थ असा नाही की मी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी उकसवलं. मी सुसाइड ग्रुपचा सदस्य असून लोकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो असंही तिनं म्हटलं होतं. पण यातलं काहीच खरं नाहीये”, असंही जावेद अख्तर म्हणाले. या प्रकरणी आता 12 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.