नवी दिल्ली, 18 मे : 224 विधानसभेच्या जागांपैकी 135 जागांवर काँग्रेसने ताबा मिळवला. 2018 मध्ये 104 जागा जिंकणारी भाजपा 66 वर पोहचली. कॉंग्रेसने कर्नाटकात भाजपवर मिळवलेल्या या दणदणीत विजयानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. म्हणून कोण आहेत सिद्धरामय्या? कशी आहे सिद्धरामय्यांची आजवरची राजकीय कारकीर्द? जाणून घेऊया…
3 ऑगस्ट 1947 ला म्हैसूर जिल्ह्यातील सिद्धरामहुंडी गावात त्यांचा जन्म झाला. वडिल सिद्धराम गौडा हे शेतकरी होते. त्यांना पाच अपत्य, त्यातील सिद्धरामय्या दुसरे. त्यांना अभ्यासात विशेष रस नव्हता म्हणून दहा वर्षांपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं नव्हतं. पण पुढे वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी तयार केलं आणि सिद्धरामय्या गावातील पहिले पदवीधर आणि वकीलही झाले.
ते केवळ कोर्टातच प्रॅक्टिस करत नव्हते, तर स्थानिक लॉ कॉलेजमध्ये अर्धवेळ शिकवत होते. प्रत्येक केसशी संबंधित नोट्स घेऊन संशोधन केल्यानंतरच ते न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करायचे. जर सिद्धरामय्या राजकारणी झाले नसते तर ते चांगले वकील झाले असते, असं त्यांचे कायदे गुरू चिक्काबोरैया सांगतात.
वकिली करत असताना सिद्धरामय्या यांना त्यांच्या नंजुंदा स्वामी नावाच्या सहकार्याने तालुक्याची निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. 1978 मध्ये सिद्धरामय्या यांनी निवडणूक लढवली आणि म्हैसूर तालुक्यातून निवडून आले. त्यानंतर त्यांनी कायदा क्षेत्र सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
1983 साली कर्नाटकातील चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल, अशी आशा सिद्धरामय्यांना होती. त्यासाठी ते बंगळुरूच्या जनता पक्षाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी एचडी देवेगौडा हे जनता पक्षाचे अध्यक्ष होते. पण काही कारणास्तव देवेगौडा यांनी सिद्धरामय्यांना तिकीट देण्यास नकार दिला. अशात सिद्धरामय्यांचे राजकीय गुरू अब्दुल नजीर साब यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यावेळी लोकदलानेही सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आणि कोणताही राजकीय अनुभव नसताना सिद्धरामय्या विजयी झाले. त्यानंतर त्यांनी रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या बिगरकाँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता.
हेही वाचा : Kishor Aware Murder Case : मित्राच्या वडिलांचा अपमान, मैत्रीसाठी धावला थेट खून करायला
मग देवेगौडा यांनीही जुन्या म्हैसूर भागात आपला जनाधार वाढवण्यासाठी त्यांना सोबत घेतलं. यानंतरचा त्यांचा प्रवास असा…
1) 1985 च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सलग दुसऱ्यांदा चामुंडेश्वरीतून आमदार
2) हेगडे यांनी कन्नड ही राज्याची प्रशासकीय भाषा म्हणून वापरण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष
3) 1985 नंतर हेगडे सरकारमध्ये पशुसंवर्धन आणि वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी
4) 1989 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम राजशेखर मूर्ती यांच्याकडून पराभव
5) 1992 मध्ये ते जनता दलाचे सरचिटणीस
6) 1994 मध्ये निवडणूक जिंकून देवेगौडा सरकारमध्ये अर्थमंत्री
7) 1996 ते 1999 दरम्यान जनता दलाचे जेएच पटेल सरकारमध्ये उपमुख्यमंत्री
8) 1999 मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर देवेगौडा यांच्यासोबत जेडीएसमध्ये प्रवेश केला
9) देवेगौडा यांनी त्यांना कर्नाटकात जेडीएसचे अध्यक्ष केलं
10) 2004 मध्ये काँग्रेस-जेडीएस युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री
11) ज्येष्ठ राजकारणी आर एल जलप्पा यांनी अल्पसंख्याक, ओबीसी आणि दलितांना एकत्र करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘अहिंदा’साठी काम
12) 2005 मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युलरची साथ सोडली
13) 2006 मध्ये बंगळुरूमध्ये सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
14) जेडीएसच्या कुरुबा जातीच्या मतासह ओबीसी आणि दलित मतांना काँग्रेसच्या मतात रूपांतर
15) 2013 च्या विधानसभेत 122 जागांनी विजयी झालेल्या कॉंग्रेस सरकारमध्ये मल्लिकार्जुन खर्गेंना डावलून मुख्यमंत्री
16) 2018 नंतर विरोधी पक्षनेता म्हणून काम
मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी कर्नाटकात अनेक योजना राबवल्या….
– 7 किलो तांदूळ देणारी अण्णा-भाग्य योजना
– सर्व शालेय विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम दूध देणारी क्षीर-भाग्य आणि इंदिरा कँटीन योजना
– पदवीपर्यंतचं मोफत शिक्षण
– महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप
– पंचायतींमध्ये महिलांची अनिवार्य उपस्थिती
– गरोदर राहिल्यानंतर 16 महिन्यांपर्यंत महिलांना पोषक आहार
अशा अनेक सामाजिक-आर्थिक सुधारणांच्या योजनांनी त्यांनी कर्नाटकात मोठे बदल घडवून आणले. या सगळ्या कामांमुळेच यंदाच्या निवडणुकीत सिद्धरामय्यांची एक लाट कर्नाटकभर होती आणि तो कॉंग्रेसच्या निर्णयात महत्त्वाचा मुद्दा ठरला, असं राजकीय विश्लेषक सांगतात. सिद्धरामय्यांच्या कामाची पोचपावती म्हणून पुन्हा एकदा कर्नाटकची धुरा त्यांच्या हाती सोपवली गेल्याचं दिसतंय. म्हणून या टर्ममध्ये सिद्धरामय्या कोणते नवे बदल कर्नाटकात करतात? हे पाहाणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.