सोलापूर, 14 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 136 जागांवर विजय मिळाला आहे. तर, भाजप 65 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणं काँग्रेस हायकमांडसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा सदस्यांच्या बैठकीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी पाठवलेल्या स्पेशल विमानातून सुशीलकुमार शिंदे तातडीने बेंगलोरला रवाना झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सुशीलकुमार शिंदे कर्नाटकला रवाना
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे तातडीने सोलापुरातून बेंगलोरला रवाना झाले आहेत. दिल्लीवरून काँग्रेस हायकमांडने सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी सोलापूरला स्पेशल चार्टर विमान पाठवले त्यातून ते बेंगलोरला गेले आहेत. यावरून कर्नाटक राज्यात सत्ता स्थापनेत सुशीलकुमार शिंदे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला. काँग्रेसने या ठिकाणी 224 पैकी तब्बल 136 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याने आता सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष असून मुख्यमंत्री कोण होणार? याकडे आहे. निवडून आलेल्या सर्व उमेदवारांची बैठक बेंगलोर येथे आयोजित केली असून. सुशीलकुमार शिंदे हे निरीक्षक म्हणून सर्व नूतन विधानसभा सदस्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, विचारविनियम करून पक्षश्रेष्ठीना अहवाल देणार आहेत.
वाचा – महाविकास आघाडीला मिळणार नवा भिडू? आणखी एक पक्ष सोबत यायला तयार
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांचंही नावही समोर येऊ शकतं. नावावर सहमती झाल्यास खरगे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकात विविध मंत्रिपदे, केंद्रात मंत्रिपद, लोकसभेचे गटनेतेपद अशी विविध पद खरगे यांनी भुषवली आहेत. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?
मुख्यमंत्री कोण असेल यासाठी आमच्या पक्षात एक प्रक्रिया असते. कोणत्याही राज्यात निवडणूक झाल्यावर आम्ही त्या प्रक्रियेनुसार काम करतो आणि निर्णय प्रक्रिया होते. त्यानुसार आमदारांची बैठक बोलावली जाईल. केंद्रातून निरीक्षक बैठकीत भाग घेतात. बैठकीमधील निर्णय पक्षश्रेष्ठींना सांगितला जातो. राहुल गांधी आणि माझ्यासह बाकीचे नेते यावर चर्चा करतात. सर्व लोक मिळून त्यावर योग्य तो निर्णय घेतो. मुख्यमंत्री कोण असेल, यावर लगेच निर्णय घेतला जाणार नाही, असं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.