नवी दिल्ली, 17 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची हा तिथा निर्माण झाला आहे. कर्नाटकातील नवीन मुख्यमंत्र्याबाबत काँग्रेस हायकमांड अद्याप कोणत्याही निर्णयावर पोहोचलेली नाही. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, नवीन मुख्यमंत्र्यांवर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वात विचारमंथन केले जात असून एक-दोन दिवसांत ही घोषणा केली जाईल.
खरंतर, सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे बहुतेक नवनिर्वाचित आमदार कर्नाटकची कमान सिद्धरामय्या यांच्याकडे सोपवण्याच्या बाजूने आहेत. परंतु, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी काहीही स्वीकारण्यास तयार नाहीत. आपण उपमुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्रीपद स्वीकारणार नसून हा प्रश्न निकाली निघेपर्यंत दिल्लीतच राहणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 50:50 चा फॉर्म्युला देखील सादर केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील. या सूत्राबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, या अंतर्गत सिद्धरामय्या पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील. यादरम्यान शिवकुमार उपमुख्यमंत्रीपद भूषवतील. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्षही होतील. त्यानंतर अडीच वर्षांनी डीके शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतील.
वाचा – प्रकाश आंबेडकर लोकसभा लढवणार? ठाकरे बालेकिल्ला सोडायला तयार!
शिवकुमार यांना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवंय
त्याचवेळी, डीके शिवकुमार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत ठाम असल्याचे दुसऱ्या सूत्राने सांगितले. या 50:50 च्या फॉर्म्युल्याबाबत त्यांनी पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्याची अट घातली आहे. यानंतर हायकमांडची इच्छा असेल तर ते सिद्धरामय्या यांच्याकडे राज्याची कमान सोपवू शकतात. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी काहीही स्वीकारणार नसल्याचा पुनरुच्चार केला. ते सिद्धरामय्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्रीपद घेणार नाहीत किंवा पक्षहिताच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.