बंगळुरू 13 मे : कर्नाटकात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार की काँग्रेस बाजी मारणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एक्झिट पोलनुसार दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर काँग्रेस 112 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल येत असल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे, निकाल हाती येण्याआधीच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप आणि जेडीएस संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. बहुतेक एक्झिट पोलमध्ये जेडीएसची सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका असेल, असं दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे हे दोन्ही पक्ष संपर्कात असल्यास खरंच याचा भाजपला फायदा होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे या हालचालींनंतर काँग्रेसनेही विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे.
ही बैठक बेंगळुरूत होणार की अन्य कुठे, हे ठरलेलं नाही. आमदारांना बंगळुरूहून इतर कोणत्याही रिसॉर्टमध्येही हलवता येईल. सध्या परिस्थिती झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे हायकमांड लक्ष ठेवून आहे. काँग्रेसने सर्व आमदारांना दाखले घेऊन बंगळुरूला येण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटकातील तीन हवाई पट्टीवर काँग्रेसने छोटी विमाने तैनात केली होती. प्रत्येक पट्टीवर पक्षाच्या राज्यस्तरीय जबाबदार नेत्याची तैनाती करण्यात आली. त्या भागातील विजयी आमदारांना घेऊन एक विमान बेंगळुरूला येईल. तर फक्त जवळच्या आमदारांनाच रस्त्याने आणलं जाईल.
राज्यात 10 मे रोजी झालेल्या 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत 73.19 टक्के ‘विक्रमी’ मतदान झालं होतं. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढतीचा अंदाज आल्याने, दोन्ही पक्षांचे नेते निकालाबाबत “अस्वस्थ” दिसत आहेत. मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.