मुंबई, 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस 137 जागांच्यावरती आघाडीवर दिसत आहे. तर, भाजपाला 63 जागांचा आकडाही पार करताना मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. निकाल समोर आल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामान्य माणसाकडून हुकूमशाहीचा पराभव’, असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाहंच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. 2024 सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वाचा – ‘..म्हणून कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव’, शरद पवारांनी केलं काँग्रेसचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यातील मोठे नेते भाजपाने कर्नाटकात प्रचारासाठी उतरवले होते. पंतप्रधान मोदी यांनी सलग दोन दिवस रोड शो केला होता. तरीही कर्नाटकात भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर जेडीएसच्या वोट बँकेचा काही भाग काँग्रेसकडे गेला असल्याचा अंदाज आहे. कारण, भाजप आपली मतांची टक्केवारी सांभाळून आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीएसला 18 टक्के मते मिळाली होती, ती यंदा सुमारे 13 टक्क्यांवर आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कमालीची वाढली आहे. अशा स्थितीत मुस्लीम समाजाची संपूर्ण मते यावेळी काँग्रेसकडे गेल्याचे मानले जात आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 42.93%, भाजपला 36.17% आणि JDS 12.97% मते मिळाली. राज्यातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झाले होते. यामध्ये विक्रमी 73.19 टक्के मतदान झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.