मुंबई 09 एप्रिल : जगभरात प्रवास करणं आणि सर्वोत्तम देशांमध्ये स्थायिक होणं कोणाला आवडत नाही! हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, मात्र ते करणं इतकं सोपं नाही. घर खरेदी करण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी किंवा तिथे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची गरज असते. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे लोकसंख्या वाढवण्यासाठी नवीन रहिवाशांची गरज आहे. त्यांना उद्योजक हवे आहेत, जे व्यवसाय सुरू करू शकतात आणि अनेक देश त्यासाठी पैसे देण्यासही तयार आहेत.
व्हरमाँट हे अमेरिकेतील एक पर्वतीय राज्य आहे. हे राज्य चेडर पनीर आणि प्रसिद्ध बेन अँड जेरी आइस्क्रीमच्या उत्पादनासाठी ओळखलं जातं. निसर्गाचे सौंदर्य व्हरमाँटला पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण बनवतं. परंतु, दुर्दैवाने राज्यात केवळ 620,000 लोक राहतात. म्हणूनच हे राज्य रिमोट वर्कर ग्रँट प्रोग्राम अर्जदारांना दोन वर्षांसाठी $10,000 (अंदाजे रु. 7.4 लाख) ऑफर करत आहे. 2018 च्या मेमध्ये व्हरमाँटचे गव्हर्नर फिल स्कॉट यांनी राज्य उपक्रमाच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. जी व्हरमाँटमध्ये जाण्यास आणि राज्यात काम करण्यास इच्छुक लोकांना $10,000 प्रदान करते
जर तुम्हाला बर्फ, हिवाळा आणि आरामशीर जीवन आवडत असेल आणि तुम्हाला स्वच्छ आणि ताजी हवा मिळेल अशा ठिकाणी जायचे असेल तर अलास्का राज्य तुम्हाला तिथे कायमचं राहण्यासाठी पैसे देईल. प्रदेशाची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने, सरकार अलास्कातील रहिवाशांना तेथील नैसर्गिक संसाधनांमधून गुंतवणुकीचे उत्पन्न देतं. हे सुमारे $2,072 (सुमारे 1.5 लाख रुपये) प्रति व्यक्ती प्रति वर्ष आहे, या अटीसह की तुम्हाला तिथे किमान एक वर्ष राहावे लागेल आणि ठराविक दिवसांसाठी राज्य सोडता येणार नाही.
स्वित्झर्लंडमधील अल्बिनन हे विचित्र शहर या छोट्या शहराची लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना पैसे देत आहे. येथे सरकार ४५ वर्षांखालील तरुणांना २० लाख रुपये आणि प्रति बालक ८ लाख रुपये देईल. मात्र, तिथे किमान 10 वर्षे राहावे लागेल, अशी अट आहे. सध्या या शहराची लोकसंख्या केवळ 240 आहे.
अँटिकाइथेरा हे ग्रीक बेट आहे, जे आपली लोकसंख्या वाढवू पाहत आहे. या बेटाची सध्याची लोकसंख्या केवळ 20 लोक आहे. मुख्यतः ग्रीक नागरिकांना बेटावर भेट देण्यासाठी बोलावण्यात आले आहे, परंतु सरकार जगभरातील लोकांचे स्वागत करत आहे. या बेटावर स्थायिक होणार्या व्यक्तीला पहिल्या तीन वर्षांसाठी सुमारे 45 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल आणि त्यांना जमीन किंवा घर देखील दिले जाईल. तेथील हवामान उत्तम आहे आणि ग्रीस अधिक लोकांचं स्वागत करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
स्पेनमधील पोंगा हे नवविवाहित जोडप्यांसाठी स्वर्ग आहे. तुम्ही आलात तर सरकार तुम्हाला दोन लाख 68 हजार देण्यास तयार आहे. पोंगा हे सुंदर आणि निसर्गरम्य शहर आहे आणि राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. कोणाला मुले असतील तर सरकार जादा पैसे द्यायलाही तयार आहे. सध्या येथील लोकसंख्या 851 च्या आसपास आहे. या धोरणाचा वापर करून शहराची लोकसंख्या वाढवायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.