नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 7 एप्रिल : राज्याच्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असते. वेगवेगळ्या पातळीनं हे कार्यकर्ते लाडक्या नेत्यासाठी शक्तीप्रदर्शनही करत असतात. यापैकी कोणता नेते मतदारांमध्ये लोकप्रिय आहे, याचे पोल्सही प्रसिद्धही होतात. या सर्वांच्या गर्दीमध्ये पुण्यातील एका गोळा विक्रेत्यानं चक्क सचिन तेंडुलकरनं मुख्यमंत्री व्हावं यासाठी मोहीम सुरू केली आहे.
मुख्यमंत्री सचिन तेंडुलकर!
तुमच्या शहरातून (पुणे)
होय, तुम्ही बरोबर वाचतायत. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला सर्व फॅन्स वंदन करतात तो आपला सचिन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी विनोद मोरे या पुणेकरांनं जोरदार मोहीम सुरू केलीय. विनोद येरवडा परिसरात बर्फ गोळ्याची विक्री करतो. तो आणि त्याचे कुटुंबीय गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून या व्यवसायात आहेत. पण, या व्यवसायापेक्षाही सचिनचे फॅन म्हणून त्यांची जास्त ओळख आहे
त्यांचं हे दुकान म्हणजे सचिन तेंडुलकरची फोटोंची गॅलरी आहे का असाच प्रश्न ग्राहकांना पडतो. इतकं यामधील सर्व वातावरण हे सचिनमय आहे. सचिनचे जबरा फॅन असलेल्या विनोद यांना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूनं मुख्यमंत्री होऊन नवी इनिंग सुरू करावी असं मनापासून वाटतंय
सचिनच का हवा?
‘गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तांतराचा खेळ मोठ्या प्रमाणात रंगलाय. राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे. या स्थिर सरकारमध्ये मुख्यमंत्री प्रामाणिक असावा अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक व्यक्तीचा विचार केला तर डोळ्यासमोर फक्त सचिन तेंडुलकर, हे नाव येतं. असा विनोद यांचा दावा आहे.
…तर सचिन तेंडुलकरनं 1 lakh run केले असते! शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
जनतेनं दिलेल्या मतांचा विचार कोणताही राजकीय पक्ष करत नाही. जनतेचा विचार करणारा आणि स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी विनोद मोरे यांनी पाच महिन्यांपूर्वी भावी मुख्यमंत्री सचिन तेंडुलकर अशी जनमोहीम सुरू केली आहे.
‘भावी मुख्यमंत्री म्हणून सचिन तेंडुलकर ही मोहीम सुरू केली तेव्हा सर्वजण मला हसत होती. पण, हळूहळू त्यांनाही हा मुद्दा पटतोय. सचिननं क्रिकेटच्या माध्यमातून देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं. त्याचप्रमाणे तो मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला नवी ओळख देऊ शकेल. गेल्या पाच महिन्यात दीड हजारांपेक्षा जास्त जणांनी फोटो काढत या मोहिमेला पाठिंबा दिलाय. सचिन तेंडुलकर या नावाच्या मॅजिकमुळे मला अनेकांचा पाठिबा मिळतोय ‘ असं मोरे यांनी सांगितलं.
दुकानाचं नावही बदललं
सचिन तेंडुलकर मुख्यमंत्री व्हावं हाच विनोद यांचा ध्यास आहे. त्यासाठी ते सतत काम करतायत. जास्तीत जास्त जणांपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या दुकानाचं नाव बदलून सचिन मलाई गोळा असं ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.