मुंबई, 2 मे : राष्ट्रपतिपद हे देशाच्या सरकारमधल्या प्रमुख पदांपैकी एक असतं. अनेक देशांमध्ये राष्ट्रपतिपद हे सर्वोच्च पद असतं. श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. भारतात राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. त्यानंतर या पदासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. काही देशांमध्ये हा कार्यकाळ कमीदेखील असतो; मात्र एक देश असा आहे, जिथे दर वर्षी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होते.
भारतात दर 5 वर्षांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असतो. काही देशांमध्ये राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ कमी असतो. स्वित्झर्लंड या देशात दर वर्षी राष्ट्रपतिपदाची निवडणूक होते. पर्यटन आणि सुंदर निसर्गसौंदर्यासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रपतिपदाचा काळ केवळ एका वर्षाचा असतो. हा देश 26 राज्यांचा मिळून बनला आहे. दर वर्षी डिसेंबर महिन्यात या देशाचे राष्ट्रपती निवडले जातात.
संघराज्यात राष्ट्रपती हे मानाचं पद असतं. राष्ट्रपतींची भूमिका केवळ प्रतीकात्मक असते. ते संघराज्य पातळीवर विविध कामांसाठी निवडले जातात. ते देशातले सर्वोच्च अधिकारी असतात. अनेक आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये ते देशाचं प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे या देशात एकदा राष्ट्रपतिपद भूषवल्यानंतर पुन्हा त्या निवडणुकीला उभं राहण्याची परवानगी मिळत नाही. स्वित्झर्लंडच्या सरकारमध्ये संघराज्य समितीचे 7 सदस्य असतात. दर वर्षी या सदस्यांपैकी एक जण राष्ट्रपतिपदासाठी निवडले जातात. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समितीतले 200 सदस्य आणि राज्य समितीतले 46 सदस्य मतदान करतात.
वाचा – चालत्या ट्रक मधून बकऱ्यांची चोरी, Video पाहून बसणार नाही विश्वास
स्वित्झर्लंडमध्ये नॅशनल कौन्सिल हे कनिष्ठ सभागृह असतं, तर कौन्सिल ऑफ स्टेट हे वरिष्ठ सभागृह असतं. स्वित्झर्लंडमध्ये फेडरल असेंब्ली आणि नॅशनल कौन्सिलचे अध्यक्ष एकच असतात. हे अध्यक्ष फेडरल सदस्यांशी चर्चा करतात व राष्ट्रपतिपदासाठी कोणत्या उमेदवारांचं नामांकन झालंय ते सदस्यांना सांगतात. उमेदवारांचं नामांकन जाहीर झाल्यावर कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाचे सदस्य त्यापैकी एकाला त्यांचं मत देतात. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतील, त्याचं नाव फेडरल कौन्सिलचे अध्यक्ष जाहीर करतात.
स्वित्झर्लंडमध्ये दर वर्षी अशाच पद्धतीने राष्ट्रपतिपदाची निवडणूक होते. जगभरात विविध देशांमध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक प्रक्रिया वेगवेगळी आहे. त्यांचा कार्यकाळही भिन्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.