मुंबई, 4 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. राष्ट्रवादीतील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना याचा मोठा धक्का बसला. लोक पवारांसमोरच अश्रू ढाळू लागले. काही कार्यकर्त्यांनी तर यंशतराव चव्हाण सेंटरच्या बाहेरच उपोषणाला सुरुवात केली. या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनीही प्रयत्न केले. मात्र, कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर आज खुद्द शरद पवार यांनी वाय. बी. सेंटरला येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी दोन दिवसात तुमच्या मनासारखा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
पवारांनी केली चूक मान्य
जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही जोपर्यंत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आहोत, पक्ष शक्तिशालीपणे उभा करावा, हा त्याचा हेतू होता. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही हो कधी म्हटलं नसतं. मी तुम्हाला विश्वासात घेवून निर्णय घेतला पाहिजे होते ते मी केले नाही ही माझी चूक होती, अशी कबुली पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
देशभरातून अनेक सहकारी आले होते, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. बाहेरच्या लोकांशी चर्चा करून एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांची जी भावना आहे, ती दुर्लक्षित केली जाणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो, दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, असं सांगत शरद पवारांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केल्याची दिसली.
वाचा – शरद पवारांच्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलले उद्धव ठाकरे, म्हणाले…
पुढचा अध्यक्ष कोण?
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.
तर, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की, साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.