ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 6 मे: महाराष्ट्राची लोककला आणि त्याच लोककलेतील अस्सल मराठीची ठसकेबाज लावणी ही तमाम मराठी जनांची अस्मिता देखील आहे. लावणी म्हटलं की आपल्याला एखादी लावणी सम्राज्ञी आठवते. परंतु, लावणी ही केवळ महिलांची मक्तेदारी नाही तर पुरुषही पायात घुंघरू बांधून आपल्या अदाकारीने लाखोंची मने जिंकू शकतो. आपला विश्वास बसणार नाही मात्र मुळचा सातारकर आणि सध्या लातूरमध्ये वास्तव्यास असणारा लावणी सम्राट शिवम विष्णू इंगळेनं हे करून दाखवलं आहे. त्याच्या लावणीनं अनेकांना भूरळ घातली असून सोशल मीडियावरही शिवमच्या अदाकारीचे लाखो चाहते आहेत.
सुरेखा पुणेकर यांना पाहून शिकला लावणी
तुमच्या शहरातून (लातूर)
शिवम इंगळे हा मुळचा साताऱ्यातील आहे. तर सध्या तो लातूर येथे कृषी पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याला लहानपणापासूनच लावणीची आवड होती. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची लावणी बघून त्याला या नृत्य प्रकाराबद्दल आकर्षण वाटू लागलं. पुणेकर यांच्या लावणीच्या कॅसेट्स आणून तो लावणी आणि त्यातील बारकाव्यांचे निरीक्षण करू लागला. यातूनच त्याला लावणीची आवड निर्माण झाली आणि त्याने स्वत:च्या पायात घुंगरू बांधायला सुरुवात केली.
मुलानं लावणी करण्यास विरोध
शिवम लावणी करू लागला तेव्हा त्याला घरातून विरोध झाला. मुलानं लावणी करणं कुटुंबीयांना न पटणारं होतं. तरीही शिवमनं लावणी सुरूच ठेवली. 11-12 वी पासून त्यानं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. शिवमची लावणी बघून कुणालाच एखादा मुलगा एवढी चांगली लावणी करू शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, काही लोकांकडून त्याला नाहक त्रासालाही सामोरं जावं लागलं.
कलेत लिंगभेद असू नये
कोणत्याही कलेत लिंगभाव बघू नये असं शिवमचं म्हणणं आहे. तो म्हणतो की, लोकांना अजूनही असंच वाटतं की लावणी ही मुलींनीच परफॉर्म केली पाहिजे. मुलांनी नाही केली पाहिजे. त्यामुळे बरेच लोक पुरुष कलावंताना शोजना बोलवत नाहीत. ही वाईट गोष्ट असून नेहमी खटकते. तुम्ही लावणीचं लावण्य बघा. जेंडर बघू नका. सध्या पुरुष कलावंत खूप सुंदर लावणी सादर करत आहेत. तुम्ही नक्की बघा. त्यांनासुद्धा शोज द्या, असं आवाहन शिवम करतो.
कुणी बायल्या तर कुणी छक्का म्हणतं..
शिवमच्या लावणीचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. लावणीचे अनेकजण कौतुक करत असले तरी काही नकारात्मक कमेंट्सही येतात. शिवम म्हणतो की, “सकाळी उठल्यावर मोबाईल पाहिला तर कमेंट बघून कधी कधी वाईट वाटतं. लोक बायल्या म्हणतात, छक्का म्हणतात. मला लोकांना हेच सांगायचंय, कुणी काहीही असो. प्रत्येकाकडे एक माणूस म्हणून तुम्ही बघा.”
शिवमचा विश्व विक्रम
महाराष्ट्राची लावणी सातासमुद्रपार पोहोचली आहे. शिवमही आपल्या कलेतून अनेकांची मनं जिंकतोय. बीडच्या गेवराईत त्यानं सलग 26 ताल लावणी करण्याचा विश्वविक्रम केला. त्याच्या या विक्रमाची दखल ‘ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नं घेतली आहे. शिवमनं न थकता, न थांबता सलग 26 तास लावणी सादर करून या विश्वविक्रमाला गवसणी घातली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.