नवी दिल्ली, 30 मे : काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी 28 मे ला नवीन संसदेसमोर ‘महापंचायत’ आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी फरफटत ताब्यात घेतले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेची दखल आता थेट सर्वोच्च कुस्ती महासंघाने घेतली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने मंगळवारी जंतरमंतर येथे त्यांच्या निषेधादरम्यान पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा निषेध केला. विहित मुदतीत निवडणुका न घेतल्यास भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.
भारतीय कुस्ती महासंघाचे विद्यमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनावर लक्ष ठेवून असल्याचे UWW ने सांगितले. “अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत,” असे एका निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, “आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत.”
यूडब्ल्यूडब्ल्यूने सांगितले की, “गेल्या काही दिवसातील घडामोडी अधिक चिंताजनक आहेत. कारण आंदोलनामुळे कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते. त्यांच्या आंदोलनाचे ठिकाणही रिकामे करण्यात आले. पैलवानांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. याशिवाय तपासाचे निकाल अद्याप न आल्याने त्यांनी निराशाही व्यक्त केली. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची विनंती करतो.”
वाचा – मीराबाई चानूसह 10 खेळाडूंचा पुरस्कार परत करण्याचा इशारा; शाहांना लिहलं पत्र; काय आहे प्रकरण?
त्यात म्हटले आहे की, “आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत.”
यूडब्ल्यूडब्ल्यू म्हणाले, “शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.