मुंबई, 28 एप्रिल : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यावर काहीच कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा दिग्गज कुस्तीपट्टूंनी आंदोलन सुरू केलं आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर गेल्या पाच दिवसांपासून ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपट्टूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता देशातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून पाठिंबा दर्शवला जात आहे. कुस्तीशिवाय इतर खेळातील दिग्गजांनीही एथलीट्सना न्याय मिळावा अशी मागणी केलीय. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा, भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, कपिल देव, टेनिस स्टार सानिया मिर्झा यांनीही कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी मागणी केलीय.
कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट केलं आहे. अभिनव बिंद्रा, नीरज चोप्रा हेसुद्धा कुस्तीपटूंसाठी मैदानात उतरलेत. पण सरकार खासदार बृजभूषण विरुद्ध कारवाई करायला तयार नाहीय. तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? सर्वोच्च न्यायालयानेही नुकतीच या आंदोलनाची दखल घेतलीय. कपिलदेवही या कुस्तीपटूंसाठी उभा राहिलाय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय हे पाहणं वेदनादायी; कुस्तीपटूंसाठी नीरज चोप्रा मैदानात
तुमच्या शहरातून (मुंबई)
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह 7 दिग्गज पैलवान जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून भारताच्या कुस्ती महासंघाविरुद्ध हे आंदोलन सुरू आहे. प्रशिक्षकांकडून महिलांचा छळ केला जातो आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक, प्रशिक्षक, महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तन करतात. मुलींचा लैंगिक छळ करतात असे गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केले आहेत.
विनेश फोगाटने गुरुवारी तिच्या भावनांना वाट मोकळी करताना भारतीय क्रिकेटपटू आणि इतर दिग्गज खेळाडूंनी मौन बाळगल्याची खंत व्यक्त केली होती. ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनाचं उदाहरण देताना म्हटलं की, असं नाही की आपल्या देशात मोठे एथलीट नाहीत. अनेक क्रिकेटर आहेत ज्यांनी ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनावेळी आपलं समर्थन दिलं होतं. आम्ही इतकेही पात्र नाहीय का? असा उद्विग्न प्रश्न विनेश फोगाटने विचारला होता.
विनेश फोगाटने रात्री माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, क्रीडा मंत्र्यांनी 12 तासच काय पण एकूण 12 मिनिटांचा वेळही दिला नाही. तर बजरंग पुनियानेसुद्धा असा आरोप केला की, क्रीडा मंत्र्यांनी त्यानंतर एकदाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा त्यांचे अधिकारी एवढंच सांगतात की साहेब बिझी आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून साहेब बिझी आहेत काय असा प्रश्न पुनियाने विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.