मुंबई,05 एप्रिल : मुंबईतील प्रेरणा काट्याल नावाच्या 26 वर्षांच्या तरुणीने तिच्या आजीला श्रद्धांजली वाहण्यासाठी केस दान केले. तिच्या आजीचं कॅन्सरने निधन झालं होतं. आजीसारख्या इतर कॅन्सर पेशंट्ससाठी विग बनवता यावं, ते विग घालून त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं, यासाठी प्रेरणाने हे पाऊल उचललं. आज तिच्या या निर्णयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने वृत्त दिलंय.
आपल्या निर्णयाबद्दलची पार्श्वभूमी सांगताना प्रेरणा म्हणाली, “मी 18 वर्षांची असताना एकदा घरातला जुना फोटो अल्बम पाहत होते, त्यातील काही फोटोंमध्ये माझ्या आजीने तिचं डोकं स्कार्फने झाकलेलं होतं, मी त्याबद्दल आईला विचारलं असता आजीला कॅन्सर होता, असं तिने सांगितलं. आजीने तीन वर्षे कॅन्सरशी झुंज दिली; पण ती अपयशी ठरली आणि मी चार वर्षांची असताना तिचं निधन झालं. तेव्हा मला जाणवलं की जेव्हा एखाद्याला कॅन्सर होतो, तेव्हा त्याच्या उपचारांचा खर्च खूप जास्त असतो आणि भावनिक ऊर्जा खूप कमी असते. शिवाय, जेव्हा रुग्णाचे केस गळायला लागतात, तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून, एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मला प्रयत्न करायचे होते. जेव्हा ते रुग्ण विग घालतात, तेव्हा काही मिनिटांसाठी का असेना ते आनंदी होतात. तेव्हाच मी कॅन्सर रुग्णांसाठी विग बनवणाऱ्या ट्रस्टला केस डोनेट करायचं ठरवलं आणि मुंबईत मला एक ट्रस्ट सापडला. पण, केस दान करण्याची माझी हिंमत होत नव्हती, अनेक वर्षे मी याबद्दल फक्त विचारच करत होते.”
उन्हाळ्यात AC शिवाय असं ठेवा घर थंड, वीजेचीही होईल बचत
तुमच्या शहरातून (मुंबई)
ती पुढे म्हणाली, “अखेर गेल्या महिन्यात 26 तारखेला माझा 26वा वाढदिवस होता. त्या दिवशी मी काहीतरी अर्थपूर्ण करावं, असं मला वाटलं. त्यानंतर माझ्या अंतर्मनाने मला ते करण्यास प्रोत्साहित केलं आणि मी हृषीकेशला जाण्यासाठी बुकिंग केलं. मला या शहरापासून लांब जायचं होतं. मी तिथे 25 तारखेला पोहोचले. पण मीच माझ्या निर्णयाबद्दल घाबरले होते, त्यामुळे मी एका मित्राला याबद्दल सांगितलं, त्यावर ‘तू वेडी आहेस का? टक्कल करू नकोस’, असं त्याने सांगितलं. पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिले.”
“दुसऱ्या दिवशी सकाळी मी गंगा घाटावर पोहोचल्यावर, एक मिनिट घेतला आणि स्वतःला म्हणाले, ‘हा तुझा क्षण आहे!’ 5 मिनिटांनंतर न्हावी हातात कात्री घेऊन माझ्या मागे उभा होता, त्या क्षणाइतका माझा स्वतःचा अभिमान मला कधीच वाटला नव्हता, न्हावी माझं टक्कल करत असताना प्रत्येक क्षणी माझा आत्मविश्वास वाढत होता. टक्कल केल्यानंतर मी घरी आई-बाबांना व्हिडिओ कॉल केला, त्यांना मला पाहून धक्का बसला. बाबा माझ्याशी बोलत नव्हते. त्यांना समजावण्यासाठी मला काही दिवस लागले,” असं प्रेरणा म्हणाली. ‘आजीने तीन वर्षे कॅन्सरशी झुंज दिली. ही माझ्याकडून तिला श्रद्धांजली होती,’ असं म्हणून मी पालकांना समजावलं. मी मुंबईतील एका ट्रस्टला माझे केस दान केले.
“माझ्या केसांपासून कुणाला फायदा झाला की नाही, त्याबद्दल मला माहीत नाही. माझा निर्णय अनेकांना न पटणाराही वाटू शकतो, पण मला माहीत आहे की मी चांगली गोष्ट केली आहे. मी दुसऱ्याला आनंदी करण्याचा प्रयत्न केला आहे,” असं ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.