मुंबई, 20 मे : चिकाटी आणि दूरदृष्टी हे गुणदेखील व्यक्तीला अनपेक्षित यश मिळवून देतात. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील 49 वर्षांच्या रुबिया डॅनियलने इटलीतील सिसिली येथील मुसोमेली या अत्यंत सुंदर शहरात जीवन बदलून टाकणाऱ्या प्रवासाला सुरूवात केली आहे. इटलीतील स्वस्त घरांकडे आकर्षित झालेल्या डॅनियल्सचं एका संधीमुळे आयुष्य बदलून गेलं. बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, रुबिया डॅनियल एका गोष्टीबाबत अनभिज्ञ होती. तिला माहीत नव्हतं की एक साहसामुळे ती केवळ एकच नाही तर तीन जुन्या मालमत्तांची मालकीण बनेल. या मालमत्ता तिने प्रत्येकी एक युरो म्हणजेच सुमारे 89 रुपयांमध्ये खरेदी केल्या होत्या. मुसोमेली येथील गृहनिर्माण प्रकल्पांची देखरेख करणाऱ्या केस 1 युरोने या व्यवहाराची पुष्टी केली आहे.
मूळची ब्राझीलची असणारी आणि आता कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या डॅनियल्सला या शहरांतील घरांमुळे तिच्या बालपणीच्या घराची आठवण झाली आणि तिचे या शहराशी वेगळे नाते निर्माण झाले. तिला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सामावून घेत येथील स्थानिकांनी तिचे प्रेमाने स्वागत केले. त्यामुळे ही जुनी आणि पडिक घरं पुन्हा बांधण्याचा तिने दृढनिश्चय केला. तिला या स्वस्त प्रॉपर्टीविषयी विशेष मोह नव्हता; पण त्यामागे तिचा एक हेतू निश्चित होता. सौर उद्योगात कार्यरत असलेल्या डॅनियलने या घरांची जुनी रचना जतन करण्याचे आणि नव्याने कमीतकमी बांधकाम करण्याचं ठरवलं. तिने या घरांचा जीर्णोद्धार पर्यावरणीय दृष्टिकोनातून करण्याचं ठरवलं. ‘एक पर्यावरणीय संकल्पना आहे. आम्हाला बांधकाम करायचं नाही तर आमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींचं पुनर्निर्माण करायचं आहे’, असं तिनी सांगितलं.
हेही वाचा – हेअर कलरपूर्वी तुम्ही या चुका तर करत नाही ना? आत्ताच घ्या काळजी अन्यथा केस होतील निर्जीव
सध्या तिचा बहुतांश वेळ सॅन फ्रान्सिको आणि मुसोमेलीमध्ये जात आहे. रुबिया डॅनियल्सने या घरांच्या पुर्नबांधकामासाठी स्वतःला समर्पित केलं आहे. या नवीन घरांमध्ये पुन्हा नव्याने जीवनाला सुरुवात करण्याचे रुबियाचे नियोजन आहे. ती एका घरात आर्ट गॅलरी उभारणार आहे. या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून स्थानिक कलागुण जगासमोर येतील आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढेल. दुसऱ्या घरात तिचं निवासस्थान असेल. येथील वास्तव्यादरम्यान समाजात एकरुप होण्याचं तिचं नियोजन आहे. तथापि, तिचं तिसरं घर तिच्या भव्य दृष्टिकोनाचं फलस्वरूप असेल. या घराचं रूपांतर तिला कल्याण केंद्रात करायचं आहे. ही तिची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या तिसऱ्या घराचं डिझाईन मुसोमेलीच्या नागरिकांना वापरण्याच्या दृष्टीने केलं जाणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात रुबिया अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तिने ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा निश्चय कायम ठेवला. 2020 मध्ये तिने घरांचं नूतनीकरण पुन्हा सुरू केलं. सुरुवातीला तिने दोन घरांची बाहेरून डागडुजी केली आणि आता तिसऱ्या घराची डागडुजी करून महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. तिच्या दृढ निश्चयामुळे रुबिया केवळ जुन्या रचनांचं पुनरुज्जीवन करत नाही तर समाजात एक नवा आशावाद निर्माण करत आहे. सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्पांचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तिचा हा प्रॉपर्टी पुनरुज्जीवन प्रकल्प अनेक शहरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.