भोपाळ 16 एप्रिल : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. यात एक मृत व्यक्ती दोन वर्षांनंतर जिवंत झाली आहे. यानंतर विधवेसारखं जीवन जगणाऱ्या त्याच्या पत्नीने दोन वर्षांनी कपाळाला सिंदूर लावला आहे. त्याला बघून एकीकडे कुटुंबीयांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेवर प्रचंड प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर, कोरोनाच्या काळात या व्यक्तीला गुजरातमधील रुग्णालयाने केवळ मृत घोषित केलं नाही, तर त्याच्या अंतिम संस्काराबद्दल सांगून त्याच्या कुटुंबीयांना त्याचं मृत्यू प्रमाणपत्रही दिलं.
तेव्हापासून त्याचा मृत्यू झालं असल्याचं कुटुंबीयांना वाटत होतं. व्यक्ती परत आल्यानंतर कुटुंबीयांनी तो जिवंत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण धार जिल्ह्यातील कडोदकला गावाशी संबंधित आहे. इथे राहणारे कमलेश पाटीदार यांना 2021 मध्ये कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबीय त्यांना गुजरातमधील वडोदरा येथे उपचारासाठी घेऊन गेले. येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उपचारानंतर काही दिवसांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाने कमलेशला मृत घोषित केलं. हे ऐकून पाटीदार कुटुंबाला मोठा धक्का बसला. पण, कोरोनाच्या काळात मृत्यूची संख्या वाढत असल्याचं पाहून त्यांनी हे सहज स्वीकारलं. रुग्णालय व्यवस्थापनाने कुटुंबासमोर मुलाचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळला होता. काही दिवसांनी रुग्णालय व्यवस्थापनाने कमलेशच्या मृत्यूचं प्रमाणपत्रही कुटुंबीयांना दिलं. यानंतर कुटुंबीय घरी परतले.
तेव्हापासून कमलेशची पत्नी विधवेसारखी राहिली आणि कुटुंबातून आनंद नाहीसा झाला. पण, दोन वर्षांनंतर कमलेशला जिवंत पाहून घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 15 एप्रिल रोजी कमलेश अचानक बडवेली गावात आपल्या मामाच्या घरी पोहोचला. त्याने आपल्यासोबत घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला.
अहमदाबादमध्ये आपण एका टोळीच्या तावडीत अडकल्याचं कमलेशने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. तिथे त्याला ड्रग्जचं इंजेक्शन देऊन ठेवण्यात आलं. कसा तरी तो या लोकांच्या तावडीतून सुटला. त्याचवेळी माध्यमांनी कमलेश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. आता आनंदाला थारा नसल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांचा मुलगा दोन वर्षांनी घरी परतला आहे. कमलेशच्या नातेवाईकांनी कानवन पोलीस ठाण्यात त्याच्या हयात असल्याची माहिती दिली आहे. पोलीसही आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.