मुंबई, 10 मे : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस सरकारचं काय होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. पण, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाही, ते मुख्यमंत्री कायम राहतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर अखेरीस उद्या निकाल येणार आहे. आमदार अपात्रतेच्या मुद्यावर शिंदे सरकार कोसळणार असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. पण, फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
‘आम्ही आशावादी आहोत, आमची केस मजबूत आहे. निकाल आमच्या बाजूने येणार आहे. मुळात सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे, त्यावर अंदाज वर्तवणे चुकीचे ठरणार आहे. पण आम्ही कोर्टाच्या निकालाबद्दल आशावादी आहोत’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
एकनाथ शिंदे निकालापूर्वी राजीनामा देतील असं विरोधक बोलत आहे? यावर फडणवीस म्हणाले की, ‘ माफ करा हा मुर्खाचा बाजार आहे, यापेक्षा जास्त बोलणार नाही. कशाला एकनाथ शिंदे राजीनामा देतील, मी सांगतो पुढची निवडणूक ही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाच लढणार आहे. सरकार एकदम स्थिर आहे’ असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंनी जोडले हात
दरम्यान, सर्वोच्च न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे., यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ते जळगाव दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते.
(16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस नाही तर…, निकालाआधी झिरवळांनी गेम फिरवला?)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. उद्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी बाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणे टाळले. सर्वांना शुभेच्छा म्हणत मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.